तीनदा जिंकूनही बाजोरियांचा पराभव का झाला? ही आहेत टॉप 5 कारणे!
बुलडाणा (कृष्णा सपकाळ) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकोला -बुलडाणा-वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अखेर कमळच फुलले. बुलडाणा लाइव्हने कालच या मतदारसंघात भाजपच्या विजयाचे भाकित वर्तवले होते आणि झालेही तसेच! महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊनही एकट्या भाजपचा पराभव करू शकले नाहीत. एकूण ८०८ मतदानांपैकी ७७७ मते वैध ठरली. त्यामुळे विजयासाठी पहिला पसंतीची ३८९ मते आवश्यक होती. निसटत्या फरकाने विजय होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना खंडेलवाल यांनी तब्बल १०९ मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला आणि तब्बल तीनदा विधान परिषदेवर जाणाऱ्या बाजोरियांना धूळ चारली. शिवसेनेसाठी हा पराभव अनपेक्षित असला तरी तीन जिल्ह्यांतील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मात्र या पराभवाची चाहूल आधीच लागली होती..!
अतिआत्मविश्वास नडला...
यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये बाजोरिया हे भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार होते. युतीच्या मतदारांची संख्या कमी असतानासुद्धा बाजोरिया विशेष कौशल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत होते. अर्थात भाजपचे कमी मात्र शिस्तबद्ध कार्यकर्तेसुद्धा बाजोरियांच्या विजयासाठी त्यावेळी झटत होते. कमी सदस्यसंख्या असताना विजय मिळविलेले असल्याने बाजोरियांचा आत्मविश्वास यंदा अधिकच वाढला होता. कारण यावेळी त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ लाभल्याने विजयाबद्दल त्यांना अधिक खात्री होती. हाच आत्मविश्वास त्यांना अधिक नडला, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
दुसऱ्यावर विसंबला, त्याचा...
शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ या निवडणुकीत मिळाल्याचे वरवर दिसत असले आणि बाजोरिया हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असले तरी पडद्यामागे मात्र वेगळ्याच घडामोडी घडत होत्या. महाराष्ट्रातील ६ विधान परिषदांपैकी ४ जागांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाली होती. नाना पटोले वारंवार स्वबळाचा नारा देत फिरत होते. शिवसेनेशी अधिक जुळवून घेण्याच्या मानसिकतेत काँग्रेस कधीच दिसली नाही. त्यामुळे काँग्रेसचे मतदार कन्फ्यूज होते. दुसरीकडे याआधीच्या निवडणुकीत ज्याच्या विरोधात प्रचार केला त्या बाजोरियांसाठी मैदानात उतरायचे कसे, असा प्रश्न राष्ट्रवादीला पडला होता. महाविकास आघाडीचे नेते फोटोमध्ये एकत्र दिसत असले तरी त्यांच्या मनात काय सुरू होते याचा अंदाज घेण्यात बाजोरिया कमी पडले.
वर्चस्वाची लढाई...
विदर्भात शिवसेनेची ताकद तशी मोजकीच. मात्र त्या मोजक्या नेत्यांमध्ये मीच मोठा असे काही शिवसेना नेत्यांना वाटते. बाजोरियांनी त्यांच्या मुलालासुद्धा विधान परिषदेत निवडून आणल्यानंतर ते मातोश्रीकडून हवं ते आणि वाटेल तेव्हा मिळवू शकतात ही भावना इतर शिवसेना नेत्यांना असुरक्षित करत होती. अकोल्यात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनबापू देशमुख, बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधव आणि वाशिम जिल्ह्यात खासदार भावना गवळी असे तगडे नेते असताना उद्धव ठाकरेंचे विश्वासू खासदार अनिल देसाईंना सर्व कार्यक्रम रद्द करून बुलडाण्यात पाठविण्यात आले. याचाच अर्थ दगाफटका होईल, अशी कुणकुण बाजोरियांना लागली असेल का, याची चर्चा आता होतेय. पक्षांतर्गत वर्चस्वाच्या लढाईत बाजोरियांचा गेम झाला असेही एक कारण बाजोरीयांच्या पराभवाला सांगितले जात आहे.
वंचित आणि अपक्षांना आपलेसे करण्यात कमी पडले...
या निवडणुकीत वंचित आणि अपक्षांची भूमिका निर्णायक होती. भाजपच्या तुलनेत बाजोरिया यांना "कागदावर' जिंकण्यासाठी मोजक्या मतांची आवश्यकता होती. मात्र तरीही वंचित आणि अपक्षांना जवळ करण्यात बाजोरिया कमी पडले. "एवढ्याची गरज नाही' हा आत्मविश्वास बाजोरिया यांना नडला आणि तिकडे खंडेलवाल एका एका मतदाराला जोडण्यासाठी मेहनत घेताना दिसले. अकोला जिल्हा परिषदेच्या राजकारणामुळे वंचितने भाजपला मतदान केल्याचे बोलले जात आहे आहे. त्यामुळेच बाजोरिया हे खंडेलवाल यांच्या तुलनेत पिछाडीवर पडले. या निवडणुकीत महाविकास आघाडीत प्रचारात कुठेही समन्वय नव्हता. दुसरीकडे भाजपचे सर्वच खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य या निवडणुकीत एकजुटीने आणि शिस्तबद्ध प्रचार करताना दिसले. त्या- त्या भागातील आमदारांना निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. ती भाजपच्या आमदारांनी निष्ठने आणि पूर्ण ताकदीने पार पडली. त्यामुळेच भाजपचा विजय आणि शिवसेनेचा पराभव झाला, असे आता बोलले जात आहे.