आ.संजय गायकवाडांच्या विरोधात कोण ठोकणार शड्डू..? बुधवंत, तुपकर, शेळके, सपकाळ, सावळे, गोडे, शिंदे की दुसरच कुणी...कुणाचा मेळ जमणार...? कशी आहेत समीकरणे...

 
Vjhc

बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा ३-४ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभेच्या आमदारांना त्यांची जागा टिकवण्याचे आव्हान विधानसभा निवडणुकीत राहणार आहे. ६ पैकी केवळ दोनच आमदारांनी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना चांगले मताधिक्य दिले. घाटावरच्या चारही मतदारसंघात प्रतापराव जाधव माघारलेले दिसले.विशेषत: बुलडाणा विधानसभा मतदारसंघात प्रतापराव जाधवांना मिळालेली २ हजार मतांची पिछाडी विरोधकांचा आत्मविश्वास दुणावणारी ठरली आहे, कारण प्रतापराव जाधव यांना सर्वाधिक लीड बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून देऊ असा गाजावाजा आ.संजय गायकवाड यांनी केला होता. ना.प्रतापराव जाधव यांना लीड मिळू दिला नाही यापेक्षा आ.संजय गायकवाड यांना लीड मिळवून देता आला नाही याची जास्त खुशी आ.गायकवाड यांच्या विरोधकांना झाली असावी. कारण याच आकड्यांच्या आधारावर आ.गायकवाड यांच्याविरोधात विधासभेच्या आखाड्यात उतरण्याचा प्लॅन महाविकास आघाडी करणार आहे..आ. गायकवाडांच्या विरोधात उतरवण्यासाठी महाविकास आघाडीकडे अनेक पैलवान आहेत, मात्र मीच आखाड्यात उतरणार असा अट्टाहास या पैलवानांनी धरला तर मात्र महाविकास आघाडीत यादवी माजू शकते. सद्यस्थितीत महाविकास आघाडीतून शिवसेना या जागेवर पहिला अधिकार सांगत आहे. अशा स्थितीत शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे. जिल्ह्यात शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा जालिंधर बुधवंत यांनी जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवली. विरोधात आ.संजय गायकवाड यांच्यासारखा तगडा पैलवान असतांना बुधवंत यांनी जोरदार किल्ला लढवला, किल्ला ढासळू तर दिलाच नाही तर उलट बाजार समिती आणि लोकसभा निवडणुकीत किल्ला आणखी मजबूत केला. त्यामुळे उमेदवारी मिळवण्याच्या या स्पर्धेत बुधवंत क्रमांक एकवर असल्याचे चित्र आहे. उबाठा शिवसेनेकडून डॉ.मधुसूदन सावळे यांचेही नाव चर्चेत आहे. दोन तीन वेळा जवळजवळ पोहचून उमेदवारीने हुलकावणी दिलेली असली तर डॉ.सावळे यांनी जनसंपर्क कमी पडू दिला नाही, अर्थात विधानसभा त्यांच्याही डोक्यात आहेच.त्यादृष्टीने डॉ.सावळे यांची तयारी सुरू आहे.

काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई शेळके यादेखील बुलढाणा विधानसभेतून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. जनसंपर्क कार्यालय सुरू करून त्यांनी त्यादृष्टीने पावले देखील उचलली आहेत. लोकसभेत दोन पावले माघार घेणाऱ्या जयश्रीताईंनी विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढायची असा चंग बांधला आहे. आग्रह काँग्रेसच्या तिकिटाचा..जागा काँग्रेसला सुटत नसेल तर ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षात जाऊन किंवा तेही मिळत नसेल तर वेगळा पर्याय..पण आता थांबायचे नाहीच असा निश्चयच शेळके यांनी केल्याचे दिसत आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ सहजासहजी उमेदवारीची माळ दुसऱ्याच्या गळ्यात पडू देणारे नाहीत. जयश्रीताई आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात फारसे काय तर काहीच काही जमत नाही..दोघे एकमेकांच्या उमेदवारीला विरोध करू शकतात. दोघांच्या भांडणात काँग्रेसचे नुकसान होत आहे हे नक्की.
लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून अडीच लाख मते घेतली. व्यक्तिगत लोकप्रियतेचा विचार केला तर तुपकर जिल्ह्यात अव्वल ठरले असे म्हणता येईल. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून देखील त्यांनी ३८ हजार मते घेतली, या ३८ हजार मतांना एखाद्या पक्षाची जोड भेटली किंवा तुपकर अपक्षही मैदानात उतरले तर लढतीचे चित्र रंगतदार ठरू शकते. अर्थात तुपकर विधानसभा लढणार का? लढली तर कोणत्या मतदारसंघातून यावर अद्याप त्यांनी जाहिररीत्या भाष्य केले नाही.
माजी आमदार विजयराज शिंदे यांचे नावही संभाव्य उमेदवारांच्या यादीत घेता येईल. अल्पसंख्याक समाज असताना शिंदे यांनी या मतदारसंघातून ३ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते भाजपात आहे. शिंदे भाजपात प्रवेश करतेवेळी आ.गायकवाड महाविकास आघाडीत होते, त्यामुळेच शिंदे भविष्यातील राजकारणासाठी भाजपात आले होते. मात्र पुढे राजकीय समीकरणे बदलल्यामुळे शिंदे यांच्या राजकीय भविष्याची कोंडी झाली आहे, भाजपात येऊन काय मिळाले याचा विचार शिंदेंनी केला तर डोक्यावर हात लावायची पाळी येईल अशी स्थिती आहे. त्यामुळे राजकारण जिवंत ठेवण्यासाठी शिंदे वेगळ्या वाटा चाचपडून पाहू शकतात अशी चिन्हे आहेत. एकदा भाजपच्या तिकिटावर आणि एकदा अपक्ष अशा सलग दोन विधानसभा निवडणुका लढलेले योगेंद्र गोडे यांच्याही आमदार होण्याच्या सुप्त इच्छा आहेतच, अधूनमधून ते देखील सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात..विधानसभेचे बघू असे बोलत असतात. मात्र सध्याच्या राजकीय समीकरणात त्यांचा "पान्हा" कुठे फिट बसतो हे त्यांचं त्यांना माहीत...एवढ्या संभाव्य उमेदवारांपैकी मेळ कुणाचा जमतो हे वेळच सांगेल...