"त्या' ठरवणार विधान परिषदेचा कोण होणार आमदार!
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येत्या 10 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची अनेक वैशिष्ट्ये राहणार असून, त्यावर निकालानंतरही खमंग चर्चा रंगणार आहे. मात्र लढाई सुरू होण्यापूर्वीच एक ठळक वैशिष्ट्य समोर आले असून, ते म्हणजे मतदारसंघातील महिला मतदारांची जास्त संख्या हे होय. याची टक्केवारी तब्बल 53 टक्के असून, तिन्ही जिल्ह्यातील नारीशक्तीचे हे निर्णायक मतदान यंदाचे एक ठळक व मजेदार चित्र ठरले आहे.
निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी अकोल्याचे जिल्हाधिकारी हे आहेत. त्यांनी मतदारसंघाची मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्याचे विश्लेषण केले असता ही मजेदार बाब स्पष्ट होते. यानुसार सध्या तरी 821 मतदार त्यांचा हक्काचा आमदार ठरविणार आहेत. यात तब्बल 432 भगिनी असून, त्या तुलनेत बंधूंची संख्या 389 आहे.
सर्वाधिक म्हणजे 368 मतदार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या दोनशेच्या घरात (199) पोहोचलीय! 285 मतदार असलेल्या अकोला जिल्ह्यात पुरुष 137 तर महिला 148 असे समीकरण आहे. सर्वात कमी म्हणजे 168 मतदार असलेल्या वाशीममध्ये 85 महिला तर 83 पुरुष मतदार असे प्रमाण आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची लढत मजेदार ठरली आहे.
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिकाचे निर्वाचित व स्वीकृत सदस्य, नगरपंचायत सदस्य यांचा भाग्यवान मतदारांत समावेश आहे. यातही महिलांचे लक्षणीय व निर्णायक प्रमाण आहे. या निवडणुकीचे वैयक्तिक अर्थशास्त्र लक्षात घेतले तर 432 महिला सदस्या अर्थात गृहलक्ष्मी आपल्या यजमानासाठी खऱ्या अर्थाने "लक्ष्मी' ठरणार आहे. यामुळे "लक्ष्मीपूजन' तर होणारच पण या लक्ष्मीचे सुद्धा बाप्यांनी पूजन करावयास हवे अशी मजेदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.