कोण म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा उमेदवार फिक्स? खा. विनायक राऊतांनी थेट पत्रकच काढलं..! म्हणाले, योग्य वेळी....

 
Bxhxh
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्याचे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते.त्यात बुलडाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर असल्याचे म्हटले होते. मात्र आता त्यावर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. विदर्भातील लोकसभेचे कोणतेही उमेदवार अद्याप निश्चीत नाहीत असे शिवसेनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खा. विनायक राऊत यांनी म्हटले आहे..
काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्याचे दावे उमेदवारांच्या निकटवर्तियांकडून सोशल मीडियावर करण्यात येत होते. बुलडाण्यात देखील जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता त्यावर पडदा पडला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अद्याप घोषित केलेले नाहीत. सर्व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच याबाबतचा निर्णय आणि उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील" असे शिवसेना नेते खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. विदर्भातील काही कार्यकर्ते आपल्यालाच खासदारकीसाठी उमेदवारी निश्चीत झाल्याचे सांगून कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याची माहिती समोर आल्याने पक्षाच्या वतीने हे स्पष्टीकरण देण्यात येत असल्याचे खा.विनायक राऊत यांनी म्हटले आहे..
 बुलडाण्यातून कुणाला उमेदवारी?
बुलडाण्यात शिवसेना(उबाठा) कडून नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा होती. मात्र खा. राऊत यांच्या स्पष्टीकरणामुळे त्यावर पडदा पडला आहे. त्यामुळे नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असली तरी त्यांनाच उमेदवारी मिळेल असे आता ठामपणे म्हणता येणार नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकर, संदीप शेळके, जयश्री शेळके यांचीही नावे लोकसभेसाठी चर्चेत आहेत. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी आता या नेत्यांकडून देखील प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही..