रणजीत पाटलांच्या पराभवाचे वाटेकरी कोण? भाजपाला धडा शिकवणारा निकाल! ज्येष्ठ पत्रकार विजय देशमुख यांनी केलेले खास विश्लेषण वाचा...

 
बुलडाणा (विजय देशमुख): विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालावर विश्लेषण करतांना  वेगवेगळे सूर लागतांना दिसत आहेत.यावेळी हैटट्रीट करण्याच्या मनसुब्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या डॉ.रणजीत पाटील यांच्यावर मविआच्या नवख्या धिरज लिंगाडेंकडून पराभवाची नामूष्की ओढवली जाणे जीव्हारी लागण्यासारखेच आहे. २०१६ च्या निवडणूकीत ४०,००० वर मतांनी आघाडी घेतलेल्या डॉ.पाटील यांना यावेळी पराभव होण्याची कल्पनाही शिवली नसेल!पण मतमोजणीच्या आरंभापासून आणि सर्व प्रकारच्या फेऱ्यात प्रतिस्पर्धी लिंगाडे यांच्या मतांच्या तुलनेत पिछाडीवर राहिलेल्या पाटील यांचेवर अशी वेळ का ओढवली? यावर ढोबळमानाने तीन कारणे लोकांत आणि विश्लेषकांत चर्चिली जात आहेत ती म्हणजे पाटील यांना अतिआत्मविश्वास नडला,नियोजनाचा अभाव आणि जुन्या पेन्शनच्या मुद्याने फटका दिला असे उघडपणे बोलले जात आहे.

   ही एवढीच कारणे पुरेशी नसावीत असे दिसते. विजयाच्या गुलालाने माखून निघायला अनाहूतांची गर्दी होते पण पराभवाचे वाटेकरी व्हायला कुणीही समोर येत नसते.अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निकालानंतर डॉ.पाटील यांच्या पराभवाचीच सर्वदूर  चर्चा होत आहे.आणि त्यासाठी अगदी त्यांनाच दोषी समजले जात आहे.पण तत्पूर्वी एक अधोरेखित करण्यासारखी बाब दुर्लक्षून चालणार नाही, ती म्हणजे सत्तारूढ भाजपाची पराभव एक्स्प्रेस औरंगाबाद -अमरावती-नागपूर अशी तीन मतदारसंघातून धावली आहे.भाजपाचा गड असलेल्या आणि उपमुख्यमंत्री फडणवीस व व प्रदेशाध्यक्ष बावन्नकुळे यांच्या विदर्भ प्रांतात भाजपावर असा पराभव चाखण्याची वेळ आली यासाठी केवळ उमेदवारांवर दोषारोपण करायचे का? पराभवाची सामूहिक जबाबदारी  शिर्षस्थ नेत्यांनीही घेणे अधिक न्यायाचे ठरेल!                                   

आमदारांनी प्रचारातून अंग का काढून घेतले?

 अमरावती विभागात भाजपाच्या शक्तीकेंद्रांचा विचार करता भाजपा,शिंदे गट व अपक्ष मिळून १९ आमदार व चार खासदार एवढी मोठी नेत्यांची फौज असतांनाच आणि खुद्द फडणवीसांचा वरदहस्त असतांना जुनेजाणते भाजपा उमेदवार पाटील हे कांग्रेसने ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवारांकडून पराभूत होतात ही बाब भाजपासाठी चिंताजनक आहे.या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सुजाण असतात.ते विचारपूर्वक मतदान करतात हे लक्षात घेतल्यास केवळ शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नावरच कलाटणी बसली असे न मानता भविष्यात राजकीय वारे कसे वाहणार? याची ही  लिटमस टेस्ट समजणे आणि त्यातून भाजपाने  धडा घेणे गरजेचे आहे.

डॉ.पाटील यांच्या प्रचारासाठी काही नेत्यांनी कुचराई केल्याचे दिसून आले.पण ते फडणवीसांचे लाडके उमेदवार होते हे ज्ञात असूनही पाटील यांना पराभवाकडे ढकलले गेले असाही अर्थ काढला जातो आहे. पाटील यांनी निवडणूक जिंकणे फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा विषय होता.पण ते निवडून आल्यास मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता  वाटत असल्यानेही अनेक आमदारांनी प्रचारातून अंग काढले होते तेही उघड बोलले जात आहे.शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर आम्हाला भाजपाने विश्वासात घेतले नसल्याने आम्ही काही करू शकलो नाही अन्यथा निकाल वेगळाच असता असे म्हटले आहे.यातून भाजपा व शिंदे गटात दरी असल्याचा किंवा भाजपाने शिंदे गटाला दूर ठेवल्याचा संदेश लोकांमध्ये गेला आहे.निवडणूकीतील पराभवासाठी  रणजीत पाटील यांच्यावर वैयक्तिक टिकाटिप्पणी होणे अटळ आहेच पण फडणवीस यांनाही चिंतन करावे लागेल,मनमानीला आवर घालावा लागेल असाच या निकालाचा अन्वयार्थ आहे!