कायदा पायदळी कोण तुडवतय? आमदार संजय गायकवाडांनी भर चौकात तलवारीने केक कापला; पोलीस गुन्हा दाखल करतील का? जयश्रीताई शेळकेंचा सवाल...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस १५ ऑगस्ट रोजी साजरा झाला. वाढदिवसाच्या संध्याकाळी शहरातील जयस्थंभ चौकात मोठ्या जल्लोषात हा वाढदिवस जाहीर स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार गायकवाड यांनी केलेले एक कृत्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आ.संजय गायकवाड आणि कुणाल गायकवाड यांनी तलवारीने केक कापला, आ.गायकवाड यांनी मंचावर उपस्थितांना तलवारीने केक भरवला होता. आता यावर विरोधक आक्रमक झाले आहेत, "बुलडाण्यात सत्ताधारी आमदारांकडून कायद्याची पायमल्ली होत आहे, कायदा पायदळी तुडवल्या जात आहे. पोलीस बघ्याची भुमिका घेत आहेत. अशा प्रकारचे कृत्य कायदेशीर दृष्ट्या चुकीचे आहे,त्यामुळे पोलीस आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा का दाखल करत नाहीत?" असा सवाल काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस जयश्री शेळके यांनी केला आहे.
  जयश्री शेळके यांनी सोशल माध्यमातून देखील आ.गायकवाड आणि पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. जिल्ह्यात तलवारीने केक कापल्याच्या घटना याआधी देखील घडल्या आहेत, तेव्हा पोलिसांनी अशा प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत.सामान्यांना वेगळा न्याय आणि आमदारांना वेगळा न्याय? असे का असा सवालही जयश्री शेळके यांनी केला आहे. 
 देशात सत्ताधाऱ्यांकडून संविधानाची पायमल्ली होत आहे, लोकप्रतिनिधी असताना देखील यांना कायदा मान्य नाही का? असा घणाघाती सवालही जयश्री शेळके यांनी केला. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता कायदेशीर दृष्ट्या कारवाई करावी नाहीतर लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडल्या शिवाय राहणार नाही असेही जयश्री शेळके म्हणाले. दरम्यान आ.संजय गायकवाड यांनी मात्र तलवारीने केक कापण्याच्या प्रकरणावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली असून तलवारीने केक कापणे गुन्हा नाही असे आ.गायकवाड यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे तलवारीने केक कापून फोटो व्हायरल करणाऱ्या विरुद्ध देखील याआधी जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत..