BULDANA LIVE SPECIAL जिल्ह्यात "सोशल" पॉवर कुणाची जास्त! जयश्री शेळके, रविकांत तुपकर,आमदार सौ. महाले आघाडीवर!

सोशल मीडियावर लाखांपेक्षा जास्त फॉलोअर! तीनदा आमदार होऊन आमदार रायमुलकरांना सोशल मीडियावर लोकप्रियता नाही! खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.शिंगणे, आ. गायकवाड, आ.फुंडकर ५० हजाराच्या आत!
 

बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून राजकारणात सोशल मीडियाचा वापर अधिक वाढला.निवडणुकीची लढाई जशी मैदानात लढली जाते तितकीच ती पक्षांच्या ,नेत्यांच्या वॉर रूम मधून देखील लढवली जाते. नेत्यांच्या सभा, दौरे, नेत्यांनी दिलेल्या भेटी गाठी, आरोप प्रत्यारोपांना द्यायचे उत्तर इथपासून तर जवळपास "सबकुछ" या वॉर रूम मध्ये ठरते.राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवर जवळपास सर्वच पक्षांच्या वॉर रूम सक्रिय आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यावर या वॉर रूमचा भर असतो..असो...इथे मुद्दा आहे तो आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील सोशल प्रभावाचा..जिल्ह्यातील राजकीय नेतेही सोशल मीडियाच्या प्रेमात पडलेले आहेत..यात काही नेत्यांना चांगलेच यश मिळाले आहे तर काहींचे सोशल मीडियावरील प्रेम अजून एकतर्फीच आहे..जिल्ह्यात सध्या जयश्री शेळके, रविकांत तुपकर, आमदार श्वेता महाले यांना सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्यात चांगलेच यश आले आहे. 

  Dhanik
                      जाहिरात 
प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जयश्री शेळके यांचे फेसबुकवर २ लाख १० हजारांच्या जवळपास फॉलोअर आहेत. जयश्री शेळके याआधी जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या, जिजाऊ ब्रिगेडचीही प्रदेश पातळीवरील जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. याशिवाय जिल्हा बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी मोठे नेटवर्क उभारले आहे. सोशल मीडियावरील लोकप्रियतेत जिल्ह्यात त्या टॉपवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राज्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत. रविकांत तुपकर यांचे फेसबुकवर १ लाख ८७ हजार फॉलोअर आहेत. तुपकर यांनी फेसबुक टाकलेल्या रिल्स, लाइव्ह व्हिडीओंना लाखापेक्षा जास्त व्ह्यूस (दर्शक) असतात. तुपकर सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. याशिवाय आधीचे ट्विटर म्हणजेच आताच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर तुपकर यांचे ४हजार ८०० फॉलोअर आहेत. तुपकर यांच्या आंदोलनाचे तसेच दैनंदिन कामकाजाचे अपडेट ते सोशल मीडियावर शेअर करीत असतात.
  सोशल मीडियावरील लोकप्रियतेत तिसऱ्या क्रमांकावर चिखली विधानसभा मतदारसंघांचा आमदार सौ. श्वेता महाले यांचा नंबर लागतो. फेसबुकवर आमदार महाले यांचे दीड लाखांपेक्षा अधिक फॉलोअर आहेत. याशिवाय एक्स या साईटवरील लोकप्रियतेत आमदार सौ. महाले जिल्ह्यात टॉपवर आहेत. त्यांचे ३९ हजारांच्या जवळपास फॉलोअर आहेत. इंस्टाग्रामवर देखील आमदार महाले यांचे ६६ हजार फॉलोअर आहेत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे फेसबुकवर १ लाख फॉलोअर आहेत. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांचे फेसबुकवर ८१ हजार फॉलोअर आहेत.एक्स या साईटवर देखील आमदार कुटेंचे जवळपास २४ हजार 
फॉलोअर आहेत.
 बाकीचे ५० हजाराच्या आत...
खा. प्रतापराव जाधव यांचे फेसबुकवर केवळ २८ हजार फॉलोअर आहेत. आगामी लोकसभा निवडणूक पाहता त्यांना सोशल मीडियावरील सक्रियता चांगलीच वाढवावी लागणार आहे. खा. जाधवांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा आमदार झालेले संजय रायमुलकर, तसेच मलकापूरचे आमदार राजेश एकडे सोशल मीडियावर दखलपात्र नसल्याचे दिसते. आ. रायमुलकर यांचे केवळ १८ हजार तर आमदार राजेश एकडे यांचे केवळ १३ हजार फॉलोअर आहेत. आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांचे फेसबुकवर ३८ हजार, आमदार संजय गायकवाड यांचे ४२ हजार, आमदार आकाश फुंडकर यांचे ३८ हजार फॉलोअर आहेत..
काय लिहावे अन् काय लिहू नये?
सोशल मीडियावरून नेते आपल्या कामाचा गाजावाजा करतांना दिसतात. सोशल मीडिया सांभाळण्याचे काम अनेक नेत्यांनी काही कंपन्यांना दिलेले आहे, तर काही नेत्यांनी त्या कामासाठी स्वतंत्र माणसाची पगारी तत्वावर नियुक्ती केली आहे. मात्र असे असले तरी नेत्यांच्या फेसबुक पेजवरील पोस्ट मध्ये अनेक चुका असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर काही टाकावे अन् काय काय टाकू नये याचे भानही अनेकदा नेत्यांना राहत नाही...