खासदार कधी भेटतील हो? पुढच्या सोमवारी या!; बुलडाण्याचे जनसंपर्क कार्यालय गायब!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. पहिल्या दोन पंचवार्षिकमध्ये मतदारांशी त्यांचा असलेला दमदार संपर्क आता कमी कमी होत जाऊन केवळ कार्यक्रमांपुरताच दिसून येत असल्याची चर्चा कार्यकर्ते, नागरिकांत आहे. जिजामाता प्रेक्षागाराच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेले त्यांचे जनसंपर्क कार्यालयही गेल्या काही दिवसांपासून दिसेनासे झाले आहे. त्याऐवजी आता तिथे महाराष्ट्र अर्बन पतसंस्थेची शाखा थाटण्यात आली आहे. जनसंपर्क कार्यालयच नसल्याने अडचणी, समस्या खासदारांपर्यंत पोहोचवायच्या कशा, असा प्रश्न नागरिक करत असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षाकडूनही नागरिकांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दर सोमवारी या ठिकाणी ते भेटतात असे सांगण्यात आले. मात्र "पुढच्या सोमवारी'चा कित्ता कायम असतो, असे चित्र दिसून आले.
शिवसेना म्हटली की थेट नागरिकांशी संपर्क आलाच. थेट "मातोश्री'वरूनच नागरिकांशी योग्य समन्वय ठेवून, त्यांच्या सूचना लक्षात घेऊन कामाचे आदेश असल्याने शिवसेनेचा कोणताच लोकप्रतिनिधी कधीच नागरिक, मतदारांना टाळत नाही. नागरिक, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीने कायम जनतेत असले पाहिजेत असा शिरस्ता आधीपासून शिवसेनेत आहे. मात्र खासदार प्रतापराव जाधव या नियमाला गेल्या काही महिन्यांपासून अपवाद ठरत असल्याचे चित्र आहे. आनंदराव अडसूळ जिल्ह्याचे खासदार असताना त्यांचा जनसंपर्क व्यापक होता. जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदारच नागरिकांना भेटण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र चांगला संदेश देणारे नाही, असे मत निष्ठावंत शिवसैनिक व्यक्त करताना दिसत आहेत.
लोकसंपर्काऐवजी आपल्या बँकेच्या शाखा वाढविण्यावर खासदारांचा भर असल्याचीही चर्चा होते आहे. कारण जिल्हा मुख्यालयी असलेल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या जागेवर आता ते संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र अर्बन पतसंस्थेची बुलडाणा शाखा उभी राहत आहे. आधीच्या तीनही लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती असल्याने प्रतापराव जाधव खासदार म्हणून निवडून आल्याचे आजही म्हटले जाते. दोनदा तर ते मोदी लाटेत निवडून आल्याची टीकाही विरोधी पक्ष करत असतात. मात्र आता युती नसल्याने पुढील निवडणूक त्यांच्यासाठी अवघड जाण्याचीच शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असते.
एवढी वर्षे खासदारकी उपभोगायला मिळाली असली तरी जिल्ह्यात शिवसेना वाढीतील त्यांचे योगदान किती, हा कळीचा मुद्दा आजही अनेक निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित करत असतात. त्यातच सातत्याने सामान्य लोकांसोबत कमी होत चाललेल्या संपर्कामुळे सामान्यांसह शिवसैनिकांतही नाराजीचे चित्र आहे. जनसंपर्क कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षातूनच ते संपर्क ठेवणार असतील तर तिथे जबाबदार व्यक्तीचीही नियुक्ती आवश्यक आहे. मात्र तिथल्या नियुक्त व्यक्तींकडून चांगला संवाद साधला जात नसल्याचीही चर्चा आहे. खासदार बुलडाण्यात कधी येतील? कधी ते या कक्षात भेटतील, याबद्दल याठिकाणी सांगण्यात येत नाही. त्यामुळे खासदार जाधव बुलडाण्यात कधी येतात अन् कधी जातात याचा उलगडा सामान्य नागरिक, कार्यकर्त्यांना होतच नसल्याचीही चर्चा आहे.