रविकांत तुपकरांची पुढील राजकीय भूमिका काय? ६ जुलैला ठरणार!मोठी राजकीय घोषणा करण्याची शक्यता? कार्यकर्त्यांची बोलावली महत्वाची बैठक; राजकीय वर्तुळाचे लक्ष...
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष असूनही तब्बल अडीच लाख मते घेत रविकांत तुपकर यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. घाटाखालच्या दोन विधानसभा मतदारसंघात अपेक्षित मते न मिळाल्याने तुपकरांचा पराभव झाला, घाटावरच्या चार विधानसभा मतदारसंघातील एकूण बेरजेत ते पहिल्या क्रमांकावर होते. निवडणुकीत पराभव झाला तरी या लढवय्या नेत्याचे पुढील राजकीय भविष्य उज्वल असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळासह सामान्यजनांमध्येही सुरू झाल्या आहेत. घाटावरच्या चारही विधानसभा मतदार संघात लक्षणीय मते घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत तुपकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तुपकर यांच्या भविष्यातील राजकारणाची दिशा काय राहील याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. आता स्वतः रविकांत तुपकर हेच त्यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असून ६ जुलैला ते मोठी राजकीय घोषणा करू शकतात. तत्पूर्वी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी त्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. बुलडाणा शहरातील शहरातील गोलांडे लॉन्स येथे ६ जुलैला सकाळी ११ वाजता ही महत्वाची बैठक होणार आहे.