नागपुरात आज काय काय घडलं? रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची फौज धडकली अधिवेशनावर! जागोजागी पोलिसांचा तगडा बंदोबस्त;​​​​​​​

स्वत: पोलीस आयुक्त होते रस्त्यावर; तुपकरांसह हजारो शेतकऱ्यांना अटक! शिष्टमंडळासोबत कृषिमंत्र्यांनी चर्चा केली पण....
 
नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांची फौज १९ डिसेंबर रोजी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशनावर धडकली. शेतकऱ्यांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अटक करुन सर्वांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांचे हे हल्लाबोल आंदोलन पाहता नागपुरात सर्वत्र तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि कृषीमंत्री यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने रविकांत तुपकरांनी आता गनिमी काव्याने आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Rt 
येलो मोझॅक,बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी १००% नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी,पिकविम्याची १००% फायनल रक्कम लवकर मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली गेल्या २ महिन्यांपासून सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. २९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत बहुतांश मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या परंतु या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल करण्याठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात हजारो शेकऱ्यांची फौज १९ डिसेंबर रोजी नागपुरात धडकली. शेतकऱ्यांची प्रचंड संख्या पाहता नागपुरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. स्वत: पोलीस आयुक्त अमितेशकुमार रस्त्यावर उतरले होते. आजवर कधी नव्हे एवढा बंदोबस्त नागपूरात पहायला मिळाला. एका आंदोलकामागे दोन पोलीस असा तगडा बंदोबस्त होता. तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची फौज अधिवेशनावर धडकली. यावेळी आंदोलकांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी बळाचा वापर करुन तुपकरांसह शेतकऱ्यांना अटक करुन ताबत घेतले. यावेळी आंदोलकांनी कापूस आणि सोयाबीन रस्त्यावर सांडून पोलीस कारवाईचा आणि सरकारचा निषेध नोंदविला. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन सीआयडी हेडकॉर्टरला ठेवले. त्यानंतर शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ चर्चेसाठी विधानभवनात पोहचले. यावेळी कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. या शिष्टमंडळा मध्ये डॉ.ज्ञानेश्वर टाले, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, विनायक सरनाईक, दत्तात्रय जेऊघाले, बळीराम सावंत, समाधान गिरी यांचा समावेश होता. परंतु कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक उत्तरे न दिल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस चर्चा न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे सरकारचा निषेध केला.
आता आंदोलन गनिमीकाव्याने
सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर गंभीर नाही. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन तसेच क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारचा आदर्श समोर ठेऊन कुठेही, कोणत्याही मार्गाने गनिमी काव्याने आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची पोलखोल करणार, राज्यभर सभा घेऊन सरकारला धारेवर धरणार असल्याचेही रविकांत तुपकर यांनी सांगितले. 
अवयक काढले विक्रीला
या हल्लाबोल आंदोलनादरम्यान हिंगोली येथील शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी किडनी, लिव्हर व इतर अवयव विक्रीला काढले होते. सरकारचे आमचे अवयव विकत घेऊन आमची कर्जमुक्ती करावी, असे फलक हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी गळ्यात घातले होते. हे शेतकरी या हल्लाबोल आंदोलनातील विशेष आकर्षण ठरले.