POLITICAL SPECIAL काय सांगता..? खा.जाधव दिसले नाहीत....वाचा नेमके काय आहे मॅटर....

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपने लोकसभेचा जोरदार प्रचार सुरू केलाय..त्या तुलनेत इतर सारेच पक्ष प्रचारात पिछाडीवर आहे.. दोन वर्षाआधीपासूनच भाजपने निवडणुकीचा प्लॅन आखायला सुरुवात केली आहे..केवळ कागदावर प्लॅन आखून भाजपवाले थांबले नाहीत तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली..लोकसभा प्रवास योजना हा त्याच प्लॅनचा भाग..इथे नमुद करण्याची बाब ही की "लोकसभा प्रवास योजना" ही त्याच मतदारसंघात आहे जिथे सध्या भाजपचा खासदार नाही,मात्र भाजपची काहीअंशी ताकद आहे..देशभरातील असे १४४ लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यावर भाजप काम करीत आहेत..२०२४ च्या निवडणुकीत भाजपला या १४४ मतदारसंघात त्यांच्या पक्षाच्या खासदार हवाय..त्या १४४ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे..या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली..गेल्या १२ महिन्यात ते ५ वेळा बुलडाणा लोकसभा मतदारसंघात येऊन गेलेत..केंद्राच्या योजनांचा प्रचार करतांना ना. यादव दिसले मात्र खा. जाधव फारसे दिसले नाहीत..विशेष म्हणजे खा. जाधव केंद्राचे जिल्ह्यातील प्रतिनिधी आहेत, भाजपसोबत ते राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत...त्यामुळे यादवांच्या दौऱ्यात खा.जाधवांच्या न दिसण्याची चर्चा होतेय..
  बुलडाणा लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याचे भाजपचे इरादे काही लपून राहिले नाहीत. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदा बुलडाण्यात आले असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलडाण्याचा पुढचा खासदार भाजपचा अशी घोषणाही करून टाकली होती. पत्रकारांनी या मुद्द्यावर छेडल्यावर त्यांनी फिरवा फिरवी केली खरी,मात्र कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांना जो संदेश द्यायचा तो त्यांनी तेव्हाच दिला होता. त्यामुळे तेव्हापासून खा. प्रतापराव जाधव यांच्यासमोर भाजपने छुपे आव्हान निर्माण केले आहे..केंद्रीय मंत्री ना.भूपेंद्र यादव यांनी ५ वेळा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा प्रवास केला. सहाही विधानसभा मतदारसंघात ते जाऊन आले..केंद्राच्या लोकोपयोगी योजनांचा प्रचार केला..त्याची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी केली..मात्र या पाचही दौऱ्यात खा. जाधव यांचा वावर फारसा दिसला नाही ही बाब कुणाच्या नजरेतून सुटेल?
  तीनदा आमदारकी आणि तीन वेळा खासदारकी जिंकणारे प्रतापराव जाधव चाणाक्ष आणि अनुभवी नेते आहेत. त्यामुळे खा. जाधव यांच्याकडे शिवसेनेच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नेतेपदाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे खा.जाधव यांना पुन्हा एकदा चौथ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील राहतील.याच अनुषंगाने १३ जानेवारीला ते चिखलीत सभाही घेणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजुला भाजपकडून देखील बुलडाणा लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार हालचाली आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा लोकसभेचा उमेदवार बदलण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.. एकंदरीतच बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप - शिवसेनेमध्ये चांगलाच छुपा कलगीतुरा रंगला आहे...
खा.जाधव कुठे ?
अलीकडे झालेल्या केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या दौऱ्यात खा.जाधव दिसले नाहीत. केंद्रीय मंत्र्यांचा शासकीय दौरा असल्यामुळे विकासकामांच्या उद्घाटन/लोकार्पण सोहळ्यासाठी शासकीय पातळीवरून खा.जाधव यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र दिल्लीदरबारी दुसरी एक महत्वाची मीटिंग असल्याने खा.जाधव या दौऱ्यात नव्हते असे सूत्रांनी सांगितले. असे असले तरी मित्रपक्षाचे खासदार असलेल्या खा. जाधव यांना भाजपकडून विश्वासात घेता आले असते..मात्र तसे होऊच द्यायचे नसल्याने भाजपने ते टाळले असावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे..याआधी झालेल्या ना.यादव यांच्या ४ लोकसभा प्रवासात देखील खा. जाधव अपवाद वगळता फारसे दिसले नाहीत..त्यामुळे चर्चा तर होईलच ना भाऊ....बघुया पुढे काय होते..लोकसभेचा रणसंग्राम जवळच आहे....