ELECTION SPECIAL जिल्ह्यातल्या १३३३ मतदान केंद्राचे 'वेबकास्टिंग'द्वारे प्रक्षेपण! लोकसभेच्या मतदानावर राहणार जिल्हाधिकाऱ्यांची नजर! गैरप्रकार टाळण्यासाठी आयोग दक्ष..

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ५० टक्के केंद्रावरील मतदानाचे 'वेब कास्टिंग'द्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. यामुळे प्रत्यक्ष मतदानावर जिल्हाधिकारी व निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे. या परिणामी केंद्रावरील गैरप्रकाराना चाप बसणार असून कायदा सुव्यस्थेच्या प्रसंगात तातडीने कार्यवाही करणे शक्य होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे हे एक ठळक वैशिष्ट्य ठरणार आहे. 
  प्रत्येक लोकसभा निवडणुकीत पारदर्शक मतदान व्हावे, गैरप्रकाराना प्रतिबंध लावण्यासाठी भारत निवडणूक आयोग विविध उपक्रम राबविते. मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आयोगाने 'वेब कास्टिंग' प्रक्षेपण चा उपक्रम राबविला होता. मात्र त्या निवडणुकीत हा 'प्रयोग' मर्यादित स्वरूपात राबविण्यात आला होता. याचे कारण केवळ संवेदनशील, उपद्रवशील मतदान केंद्रावरीलच मतदानाचे असे प्रक्षेपण करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक कक्षात अश्या केंद्रावरील मतदान प्रक्रिया दिसते. यामुळे गैरप्रकार बरोबरच मतदानमध्ये ( मशीन नादुरुस्ती आदी कारणामुळे) व्यत्यय आल्यास तत्काळ मदत करता येणे शक्य होते. तसेच क्षेत्रीय पथकांना त्या केंद्रा पर्यंत पोहोचणे शक्य होते. यामुळे २०१९ च्या निवडणुकीत हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला होता.
    
  ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने होऊ घातलेल्या लोकसभा लढतीत याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत एकूण केंद्राच्या ५० टक्के केंद्रांचे वेब कास्टिंग द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामध्ये संवेदनशील सह अन्य केंद्रांचाही समावेश राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास, जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात २२६६ मतदान केंद्र राहणार आहे. यापैकी ११३३ केंद्रांचे वेब प्रक्षेपण करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात केंद्रावरील मतदान प्रक्रिया पाहता येणार आहे. या प्रक्षेपण व कक्ष निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 
मतमोजणी व 'स्ट्रॉंग रूम' वरही नजर!
  दरम्यान यंदा मतमोजणी केंद्र व ' स्ट्रॉंग रूम' वर देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने करडी नजर ठेवण्यात येणार आहे. मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट ठेवण्यात येणाऱ्या' स्ट्रॉंग रूम' वर सीसीटीव्ही ची नजर राहणार आहे. मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही ची नजर राहणार आहे. याशिवाय मोजणीचे ' वेब कास्टिंग 'द्वारे प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे.