आम्ही टक्केवारीवर मिरवणारे नाही; रविकांत तुपकरांचा आ. रायमूलकर यांच्यावर पलटवार

 
Tupkr
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आम्ही शेतकऱ्यांचे देणे लागतो, त्यांच्याकडून गाड्या-घोड्या घेत नाही, असे विधान आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी केल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या विधानाला धरुन कडक प्रहार केला आहे. जनतेने तीन वेळा लोकवर्गणी करुन निवडून दिले त्याच जनतेच्या विकासाच्या कामातून टक्केवारी घेणे आणि वरतून पुन्हा साधेपणाचा आव आणने म्हणजे सर्वसामान्यांची फसवणूक करणेच आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या घामासाठी जिवाची पर्वा न करता लढणारे कार्यकर्ते आहोत. 

आम्ही शेतकऱ्यांचे देणे लागतो, घेणे नाही असे म्हणता तर मग निवडणुकीत शेतकऱ्यांकडून लोकवर्गणी का घेतली? असा सवाल तुपकरांनी केला आहे. खासदार आणि आमदार यांची परिस्थिती पूर्वी सामान्य होती परंतु आता ते गडगंज श्रीमंत आहेत. त्यांनी शेतात नेमके कोणते बियाणे पेरले, कोणते खत टाकले हे त्यांनी आमच्या शेतकऱ्यांनाही सांगावे, शेतकऱ्यांनाही असेच श्रीमंत व्हायचे आहे. पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष असताना काय काय केले, कुठे जमिनी आहेत याची आम्हाला माहिती आहे.

आलीशान गाड्या कोठुन आल्या, समृद्धीत मटेरीयल पुरविण्याचा ठेका माझा तर नव्हता बाबा...! पेनटाकळीत उडी मारुन आंदोलन करतांनाही तुम्ही सत्तेत होते, तुमच्या पक्षाची सत्ता असतांना, तुमचे मुख्यमंत्री असतांनाही पेनटाकळीत उडी मारण्याची वेळ तुमच्यावर का येते? सत्तेत असुनही तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही, हे अपयश म्हणावे लागेल. आम्ही गेल्या २० वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी लढा देत आहोत. कोणतेही राजकारण आणि पक्ष न पाहता आम्ही केवळ शेतकऱ्यांचा लढा लढत आहोत. ज्या पक्षाने तीन वेळा आमदार केले त्याच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी पळून जाणाऱ्यांमधले आम्ही नाही. आम्ही प्रत्येक आंदोलनातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीना काही पाडून दिले आहे. यावर्षी केलेल्या एल्गार मोर्चा, जलसमाधी आंदोलन आणि आत्मदहन आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १७४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करुन दिली. परंतु पाच महिने शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या नाही तेव्हा आमदार, खासदार बोलले नाही. आम्ही पिकविम्याचे १५९ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले, हे सर्वश्रृत आहे. यामुळे प्रत्येक गावात सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर आमच्या बाजूने उभा राहत असल्याचे पाहून लोकप्रतिनिधींना हादरा बसत आहे.

लोकसभेची धास्ती त्यांनी आतापासूनच घेतली आहे. आ. रायमुलकर यांच्याकडून बोलवून घेतले जात आहेत, त्यांना आरोप करण्यासाठी पुढे केले जात आहे, याची जाणीव आम्हाला आहे. मित्र मंडळीने आपल्या वाहनासाठी पुढाकार घेतला आणि जगजाहीरपणे वाहनप्रदान सोहळा घेतला. यात लपवण्यासारखे काहीच नाही. आम्हाला लोकांनी वाहन घेऊन दिले हे आम्ही जगजाहीर कबूल कले आहे. तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत लोकांनी लोकवर्गणीतून मदत केली आहे. परंतु तुम्ही ती मदत जाहीर केली नाही उलट लोकांनी एवढी मदत करुनही लोकांच्या विकासकामांमधून टक्केवारीचा मोह मात्र सुटला नाही, आम्ही जे करतो ते उघड आहे. आम्ही आमच्या घामाचे दाम माघणारे आहोत, टक्केवारीवर मिरवणारे नाही, असा टोला तुपकरांनी लगावला आहे.

सोयाबीन-कापसाच्या भावासाठी काय दिवे लावले

खासदार, आमदारांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न असलेल्या सोयाबीन-कापसाच्या भावासाठी काय केले? असा प्रश्न तुपकरांनी केला आहे. खासदार, आमदार गतवेळी सत्तेत होते आणि यावर्षीही सत्तेत होते आणि आहेत परंतु त्यांनी सोयाबीन-कापसाच्या भावासाठी सभागृहात आवाज उठविला नाही. या प्रश्नावर त्यांनी सरकारवर दबाव का निर्माण केला नाही, याचेही उत्तर शेतकऱ्यांना मिळाले पाहीजे, असे तुपकरांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज का नाही

खासदार व आमदारांकडे पतसंस्था आहे. त्यांना जर शेतकऱ्यांचा खरच कळवळा आहे तर त्यांनी या पतसंस्थांमधून शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज का दिले नाही. पतसंस्थेच्या आडून खासगी सावकारी केली जात आहे का? ज्या शेतकऱ्यांनी दोघांनाही निवडणुकीत कायम विजयी केले अशा शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहता त्यांना पतसंस्थेतून बिनव्याजी कर्ज देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम का झाले नाही, असाही सवाल तुपकरांनी केला आहे.