धोधो मतदान! संग्रामपुरात ८७ तर मोताळा नगरपंचायतीत ८३ टक्के मतदान!! उद्या निकाल; कुणाचा उधळणार गुलाल?
Jan 18, 2022, 21:11 IST
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील दोन नगरपंचायतींच्या प्रत्येकी ४ जागांसाठी आज, १८ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत धोधो मतदानाची नोंद झाली. संग्रामपूरमध्ये ८६.४८ तर मोताळ्यात ८२.९४ टक्के असे उत्साही मतदान झाले. उद्या, १९ जानेवारीला दोन्ही ठिकाणच्या मिळून एकूण ३४ जागांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. यामुळे दोन्ही ठिकाणचे आकाश व तहसील कार्यालय परिसर गुलालाने माखलेला असणार हे नक्की असले तरी तो गुलाल कुणाचा हे दुपारी १२ च्या आसपासच स्पष्ट होणार आहे.
ओबीसी आरक्षण रद्द ठरल्याने पहिल्या टप्प्यात १३ तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे आज ४ जागांसाठी मतदान पार पडले. पहिल्या टप्प्याप्रमाणेच आजही ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. तिहेरी लढत झालेल्या संग्रामपूरमध्ये १३३९ पैकी ११५८ (८६.४८ टक्के) मतदारांनी आपला पवित्र हक्क बजावला. मोताळ्यात २२२१ पैकी १८४२ जणांनी मतदान केले.
स्थळ तहसील; मुहूर्त दहाचा...
दरम्यान, ३४ जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या, १९ जानेवारीला संबंधित तहसील कार्यालयात होणार आहे. सकाळी १० वाजता सुरू झालेली मोजणी पार पडल्यावर दुपारी एकच्या आसपास निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील बहुरंगी चुरस पाहता उद्या तहसील परिसरात तुफानी गर्दी उसळणार असून, तगडा बंदोबस्त देखील तैनात राहील अशी चिन्हे आहेत.