५ बाजार समित्यांसाठी आज मतदान आजच निकाल! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अन् भाजप शिवसेनेत संघर्ष! मेहकर आणि बुलडाण्याच्या लढतीकडे साऱ्यांच्या नजरा

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज, २८ एप्रिलला मतदान होत आहे. ५ बाजार समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे. महाविकास आघाडी आणि शिंदेची शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत आमने सामने आहे.आज संध्याकाळीच या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
 

२७  एप्रिलला सायंकाळी ५ वाजता प्रचार संपुष्टात आला. दरम्यान काल रात्री अनेक उमेदवारांनी मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या. आज मतदान होईल आणि त्यानंतर संध्याकाळी कुणाचा विजय होतोय याचे चित्र स्पष्ट होईल. मेहकर आणि बुलडाण्यातील निवडणुकीकडे प्रामुख्याने अनेकांच्या नजरा लागून आहेत. मेहकरात खासदार जाधवांच्या पॅनलला यंदा चांगलेच आव्हान महाविकास आघाडीने उभे केलेय. तर बुलडाण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आणि आमदार संजय गायकवाड  यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. मलकापूर बाजार समितीची निवडणूक ही तब्बल १५ वर्षानंतर होणार असल्याने तिथल्या सामन्याकडेही अनेकांच्या नजरा भिडल्या आहेत. राज्यातल्या सत्ता संघर्षाचा निकाल कोणत्याही क्षणी लागू शकतो, त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुका सत्ताधारी आणि विरोधकांसाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत.