मतदान संपले; आता चर्चेची लढत! चायटपरी ते बार, 'कोन येतं ची चर्चा बारबार...!

 
बुलढाणा
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा मतदार संघात यंदा चुरशीची बहुरंगी अगदी स्पष्टच सांगायचं तर तिरंगी लढत रंगली. दहाबारा दिवस इलक्शन चा विलक्षण प्रचार रंगला. लढत ईतकेच मतदान सुद्धा अक्षरशः वादळी अवकाळी ठरलं! अवकाळी पाऊस, वादळी वारं, तेबी इतकं की एका मतदान केंद्राचं छत कोसळावे इतकं. आता या बंदया भानगडी संपल्यावर आता सुरू झाली चर्चा नव्ह एक महिना प्लस आठवडा भर चालणारी महाचर्चा. ती म्हणजे कोन निवडून येतो? हीच चर्चा घरादारात, पारावर, तीच चावडीवर, चाय च्या टपरी, हॉटेल अन बिअर बार मध्ये पण...  यंदा इलक्शन मधी राजकीय आखाड्याचे वस्ताद भगवाधारी प्रतापराव जाधव, जुनेजानते आघाडीविर थेट झेडपी मधून लोकसभेत, रस्त्यावरचा शेतकरी नेता रविकांत तुपकर व विकासाचे मिशन घेऊन यात्रेवर निघालेले संदीपदादा शेळके थेट लोकसभेच्या आखाड्यात डायरेक्ट उतरले.यांच्या संग आणखी १७ लहानसहान,नवीन लिंबूटिंबु बारकाले पैलवान बी उतरले. त्यांनी सगळ्यांनी मिळूनसन्या प्रचाराचा इतका धुराळा उडविला की शहर अन गावखेडेच काय, जमीनच काय अस्मानबी माखून टाकली! गरमा इतका वाढवला, इतका वाढवला की मतदानाच्या दिवशी धोधो पाऊस पडला. बुलढाण्यातल्या या २१ पैलवानांना निसर्ग बी कावला व्हता असे म्हणा बर तर...
आता ह्यो दांगडो आटोपला हाय,पण भलतीच भानगड, झेंगाट सर्वांच्याच माग लागलंय! ते म्हणजे वरती जे सांगितलं तेच निवडणुकीच्या निकलाचं! काही मंडळी तर फोनवर(त्योच आपलं मोबाइलवर) समोर अगदी सोयऱ्यांची, ओळखी पाळखीच्या माणसांची खास करून राजकारणाचा किडा चावलेल्यांची भलीमोठी यादीच घेऊन बसतात. फोन उचलला की, रामराम नाय की तू कसा हाय हे विचारण न्हाय, डायरेक्ट कसं मुद्यांवर' कोण निवडून येतं, मेहकर की चिखलीचा दाढीबाबा, की पाना हाती घेऊन धूम करणारा रविभाऊ? मग त्यावरच चर्चा. 
चाय पे चर्चा न्याहारी, जेवण और पेग परभी..
  इलक्षणच्या भुताने झपाटलेल्या या कामात बिझी लाखो माणसांचा 4 जूनपर्यंत उठसुठ ह्योच धंदा राहणार हाय। मग त्यावर गणित मांडायचं, आपला माणूस कसा निवडून येतो हे घसा कोरडा करू करू सांगायचं. पारावर, चावडीवर शेतात अन चौकात अड्डे करून बसणाऱ्याची ह्योच विषय.