चिखलीत विनाईक सरनाईक, नितीन राजपुतांचे अन्नत्याग! पीकविमा, नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी;

भक्ती महामार्गालाही विरोध! सरनाईक म्हणाले, सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील..
 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चिखली तहसील कार्यालयासमोर विनायक सरनाईक, नितीन राजपूत बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. आज,५ ऑगस्ट पासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पिकविमा, नुकसान भरपाई, भक्ती महामार्गाला विरोध यासह विविध मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
 चिखली तालुक्यातील गेल्या वर्षीचा खरीप व रब्बी हंगामातील सरसकट १००% पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा.पिकविम्याच्या नुकसान क्षेत्र व एकुन क्षेत्रासह गावनिहाय याद्या लावण्यात याव्या. तालुका पिकविमा तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन तुटपुंजी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांचा तफावत रक्कम अहवाल शासनास पाठविण्यात यावा. खरीप व रब्बी हंगामातील अपात्र शेतकऱ्यांनाही पिकविम्याचा लाभ द्यावा.
चिखली तालुक्यातील ऑनलाईन प्रणालीमुळे ई-केवायसी करूनही अडकून पडलेली व वगळेल्या शेतकऱ्यांची हरभऱ्याची नुकसान भरपाई तातडीने मिळावी.भक्ती महामार्ग तातडीने रद्द करावा. शेतकऱ्यांची तातडीने संपूर्ण कर्जमुक्ती करावी व मागील रखडलेले ५० हजार रु. प्रोत्साहन अनुदान तातडीने द्यावे.
चिखली तालुक्यात रोजगार हमी योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व रखडलेले विहीर, गोठे व घरकुलाचे प्रस्ताव आदी मागण्यासाठी विनायक सरनाईक व नितीन राजपूत उपोषणाला बसले आहेत. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, आगामी विधानसभा निवडणुकीत जनता धडा शिकवेल असे सरनाईक यांनी म्हटले आहे.