विजयराज शिंदे मेहनती! काबाडकष्ट करून खूप काही कमावलं; स्वतःच्या नावावर ५५ एकर, पत्नीच्या नावावर ४१ एकर शेती! पती-पत्नी मिळून ११ कोटींच्या संपत्तीचे मालक!

साडेपाच कोटींचे कर्ज फेडायचे बाकी! शिक्षण किती? वाचा..निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात शिंदेंनी काय लिहिलंय...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी काल लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरत बंड पुकारले. विद्यमान खासदार भाजपला विश्वासात घेत नाहीत, सन्मान देत नाहीत. इथून कमळ चिन्हावर खासदार असावा ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरतांना निवडणूक आयोगासमोर शपथपत्र सादर केले. त्या शपथपत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरण दिले आहे. त्या शपथपत्रावरून शिंदे अतिशय मेहनती आणि कर्तृत्ववान असल्याचे दिसते. एक सामान्य शिवसैनिक ते तीन वेळा आमदार झालेल्या शिंदेंनी अतिशय काबाडकष्ट करून ९६ एकर शेतजमीन कमावली, त्यात स्वतः शिंदे यांच्या नावावर ५५ एकर तर पत्नीच्या नावावर ४१ एकर शेतजमीन आहे. याशिवाय शिंदेंच्या नावावर दोन प्लॉट, जिजामाता क्रीडासंकुल मध्ये एक दुकान तर पत्नीच्या नावावर १ कोटी रुपये बाजारमूल्य असलेली प्लॉटिंगची जमीन आहे. शिंदे दांपत्याकडे असलेल्या एकूण संपत्तीपैकी ५० लाख रुपयांची संपत्ती ही शिंदेंना वारसाहक्काने मिळाल्याचे शिंदेंनी लिहिले आहे, त्यात निवासी इमारतीचा समावेश आहे. विजयराज शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.अर्पिता शिंदे या दोघांकडे मिळून एकूण ११ कोटींची संपत्ती आहे. त्यात त्यांच्याकडे असलेली रोकड, सोन्याचे दागिने, शेअर्स, गाड्या, ट्रॅक्टर, शेतजमीन आणि प्लॉटिंग जमिनीचा समावेश आहे.मात्र एवढे असले तरी शिंदे कर्जबाजारी देखील आहेत. विजयराज शिंदेंवर ५ कोटी ५० लाख ५३ हजार ३०५ रुपयांचे कर्ज आहे.
विजयराज शिंदेंनी त्यांचे वार्षिक उत्पन्न २८ लाख ९१ हजार ५९० रुपये तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ११ लाख २४ हजार ८० रुपये इतके दाखवले आहे. तर उत्पन्नाचा स्रोत शेतीतून येणारे उत्पन्न, मालकीच्या इमारतीतून येणारे भाडे आणि माजी आमदार म्हणून मिळणारे पेन्शन असा दाखवला आहे. 
  शिंदेकडे ३ चारचाकी,पत्नीकडे ट्रॅक्टर..
  विजयराज शिंदे यांनी शपथपत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ३ चारचाकी कार आहेत. त्यात एक फोर्ड कंपनीची, एक ह्युंदाईची अल्काईझर तर टोयाटा कंपनीची यंदा खरेदी केलेल्या २४ लाख ६९ हजार रुपयांच्या नव्या कोऱ्या इनोव्हा कारचा समावेश आहे. विजयराज शिंदेच्या पत्नी सौ.अर्पिता शिंदे यांच्याकडे शेतीकामासाठी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर आहे. 
सोन्याचे दागिने..
विजयराज शिंदे यांच्याकडे सोन्याची साखळी, दोन अंगठ्या, सोन्याचे ब्रासलेट असे ७ लाख १८ हजार रुपयांचे तर सौ.अर्पिता शिंदे यांच्याकडे मंगळसूत्र, पाटल्या, सोन्याचा चपलाहार असे ८ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने आहेत. याशिवाय शिंदे यांच्याकडे चिखली अर्बनचे २ लाख ३८ हजार रुपयांचे शेअर्स आहेत, त्यांच्या पत्नीकडे देखील १ लाख ९ हजार रुपयांचे शेअर आहेत.
किती रोकड, बँकेत किती जमा?
विजयराज शिंदे यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे काल,१ एप्रिल पर्यंत २ लाख रुपयांची रोकड तर पत्नीकडे दीड लाख रुपये नगदी होते. याशिवाय विजयराज शिंदे यांच्या चिखली अर्बन बँकेच्या एका खात्यात ५ लाख ९० हजार तर दुसऱ्या खात्यात ५ हजार रुपये आहेत. एचडीएफसी बँकेच्या खात्यात १ लाख ८९ हजार ६१६ तर भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात ७४ हजार रुपये जमा आहेत. सौ.अर्पिता शिंदे यांच्याकडे विविध बँकेच्या खात्यात ९० हजार रुपये जमा आहेत. शिंदे यांनी एलआयसी कंपनीच्या प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या दोन पॉलिसी काढल्या आहेत तर सौ. अर्पिता शिंदे यांनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीची २१ लाख रुपयांची पॉलिसी काढली आहे.
कर्जबाजारी शिंदे..
शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर एचडीएफसी बँक शाखा बुलडाणा चे ३ कोटी ५८ लाख ८६ हजार ७३९ रुपयांचे कर्ज आहे.भारतीय स्टेट बँक शाखा बुलडाणा चे २८ लाख २० हजार ८७६ रुपये, युको बँक शाखा बुलडाणा चे ३५ लाख ६६ हजार ७८१ रुपये, आदिती अर्बन शाखा बुलडाणा चे १ कोटी ५ लाख ५८ हजार ९०९ रुपये तर टोयाटा फायनान्स चे २२ लाख २० हजार रुपये कर्ज आहे. विजयराज शिंदे यांच्यावर आजघडीला एकूण ५ कोटी ५० लाख ५३ हजार ३०५ रुपयांचे कर्ज असल्याचे शपथपत्रात नमूद आहे.
कुठे कुठे शेतजमीन?
विजयराज शिंदे यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या स्वतःकडे ५५ एकर तर पत्नीच्या नावावर ४१ एकर शेतजमीन आहे. येळगाव, बुलडाणा, पिंपळगाव देवी(ता. मोताळा), बोराखेडी(ता. मोताळा), मोहेगाव (ता. मोताळा), मढ, सागवन, वरवंड,जयपूर(ता. मोताळा), लोखंडा (ता.खामगाव) वाघजाळ (ता. मोताळा) येथे शिंदे दांपत्याच्या मालकीची शेतजमीन आहे. विजयराज शिंदे यांच्यावर ४ गुन्हे दाखल असून त्यात कोरोना काळात आदेशाचे उल्लंघन करून जमाबंदी तसेच अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा आहे. शिंदे यांचे शिक्षण बीकॉम दुसऱ्या वर्षांपर्यंत झाले आहे.