स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन युवा आघाडीचा एल्गार मोर्चा! जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर; सतीश पवार म्हणाले,

"मागण्या मान्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही"!  वाचा काय आहेत मागण्या...
 
 
pawar

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध न्याय्य मागण्या घेऊन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात १४ ऑगस्ट रोजी एल्गार पुकारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा धडकणार आहे.

poster

मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून हा मोर्चा विराट ठरणार असल्याचा दावा सतीश पवार यांनी केला आहे. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेसोबतच शासकीय कर्मचारी देखील या सरकारच्या जनविरोधी धोरणाला वैतागले आहेत. सुशिक्षित बेरोजगारांसाठी तर सरकारकडे योजनाच नाही. त्यामुळे लोक 'वंचित'च्या माध्यमातून न्याय मागत असल्याचे पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. या मोर्चाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी केंद्र व राज्य शासनाला निवेदने देण्यात आली. धरणे आंदोलने करून मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला.मात्र, शासन सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांसंदर्भातसकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. 


 मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. निद्रिस्त असलेल्या शासनाला जागी करण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीच्या वतीने काढण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी सांगितले. 

या आहेत मागण्या..

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध मंडळामार्फत रोजगार उभा करण्यासाठी तत्काळ कर्जपुरवठा द्या, कर्ज देताना सिबिलची अट रद्द करावी, शासकीय नोकरीचे आवेदनपत्र भरताना आकारण्यात येणारे शुल्क (चलान) सरसकट माफ करावे, जिल्हा परिषद शाळेवर रिक्त जागा भरण्यासाठी होत असलेली सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपातील कंत्राटी पद्धतीची भरती प्रक्रिया तत्काळ थांबवावी व रखडलेली पवित्र पोर्टल शिक्षक भरती करण्यात यावी, नोकर भरती करताना पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्र स्थानिक किंवा विद्यार्थ्यांच्या पसंती क्रमाप्रमाणे देण्यात यावे, पोलीस किंवा सैनिकी भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची जेवण व निवास व्यवस्था करावी, सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळेपर्यंत निर्वाह भत्ता देण्यात यावा, खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार किमान वेतन लागू करावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे...         

तर स्वस्थ बसणार नाही.....

सर्वसामान्यांच्या हितासाठी झटत असतानाच शासनाकडून दुर्लक्षित असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याकरिता वंचित बहुजन युवा आघाडीने पुढाकार घेतला आहे. मागण्या निकाली निघेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे सतीश पवार यांनी सांगितले