लई गाजला वन बुलडाणा मिशनचा महिला मेळावा! संत नगरी शेगावात महिलांची तुडूंब गर्दी; संदीप शेळके मुद्द्याच बोलले!म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात मातृशक्तीचे योगदान महत्वाचे!

महानगरात शिक्षणासाठी जाणाऱ्या युवतींसाठी पुण्या - मुंबईत हॉस्टेल हवे! मुलींसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राचीही केली मागणी...
 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंदवी स्वराज्याची संकल्पना माडणाऱ्या राजमाता जिजाऊंचा हा जिल्हा आहे.मात्र असे असले तरी जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी शासकीय पातळीवर हवे तसे प्रयत्न झाले नाहीत. लोकप्रतिनिधी महिलांच्या प्रश्नांवर बोलत नाही..जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे..मात्र वर्तमानपत्रात बातमी वाचून हळहळ व्यक्त करण्याव्यतिरिक्त त्यावर उपाययोजना झाल्या नाहीत अशी खंत व्यक्त करीत बुलडाणा जिल्ह्याच्या गौरवशाली इतिहासात मातृशक्तीचे योगदान महत्वाचे आहे, आता जिल्ह्याच्या विकासातही मातृशक्तीचा सहभाग हवा आहे..त्यासाठी आधी महिलांचे सक्षमीकरण महत्वाचे असून वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करणार असल्याचे प्रतिपादन वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले. संत नगरी शेगावात वन बुलडाणा मिशनच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. येथील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या वर्धमान जैन भवनात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अगदी तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा मेळावा प्रचंड गाजला..आतापर्यंत लई मेळावे पाहिले पण संदीप शेळके मुद्द्याच बोलले अशी चर्चा कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांमध्ये सुरू होती...
  जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत. जिल्ह्यात एक स्वतंत्र महिला सुरक्षा हेल्पलाईन असली पाहिजे. टोल फ्री नंबरवर भगिनी आपल्या अडचणी त्या हेल्पलाईन नंबर वर मांडतील आणि त्यावर कारवाई करण्यासाठी महिला कमांडचे एक पथक पाहिजे असे संदीप शेळके यावेळी म्हणाले.
माँ जिजाऊंच्या नावाने हवा एकच ब्रँड..
 
हिंदवी स्वराज्याची उभारणी करणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्माने पावन झालेला हा जिल्हा आहे.
जिजाऊंच्या नावाने बचतगटांच्या महिलांच्या उत्पादनासाठी एक ब्रँड असावा. जिल्ह्यातील विधवा, निराधार, दिव्यांग, शेतमजूर महिलांची शासकीय नोंदणी अभियान राबविण्यात आले पाहिजे. महिला आरोग्य अभियान, युवती आवास योजना, बुलढाणा युवती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्पोर्ट्स फेस्टिवल, वार्षिक महिला भजनी मंडळ महोत्सव, बुलढाणा वुमेन सिंगिंग व डान्सिंग आयडॉलचे अशी स्पर्धा वर्षातून एकदा आयोजित केली पाहिजे. यामधून महिलांच्या कलागुणांचा विकास होईल आणि स्पर्धा जिंकण्याची उर्मी वाढेल. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ स्त्री शक्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. याद्वारे महिलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता येईल, असा विश्वास संदीप शेळके यांनी व्यक्त केला. 
महिलांनी अंगभूत गुणांद्वारे प्रगती साधावी
 
 महिलांमध्ये बचत, काटकसर, चिकाटी हे नैसर्गिक गुण आहेत. घेतलेल्या कर्जाची महिला नियमित परतफेड करतात. त्यांचा व्यवहार चोख असतो. महिलांचे एकही कर्जप्रकरण थकीत नाही. त्यामुळे कोणतीही बँक त्यांना कर्ज देण्यास तयार होते. महिलांनी आपल्यातील गुण ओळखावे. त्याचा योग्य वापर करुन प्रगती साधावी. राजर्षी शाहू परिवार कायम आपल्या पाठीशी आहे असेही संदीप शेळके यावेळी म्हणाले.
महानगरात शिक्षण घेणाऱ्या युवतींसाठी हॉस्टेल व्हावे..
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. जिल्ह्यात अद्याप दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा नाहीत ही शोकांतिका आहे. ती उभारण्याबरोबरच पुणे - मुंबईसारख्या महानगरात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या तरुणींसाठी आमदार, खासदारांच्या निधीतून हॉस्टेल सुविधा उभी राहण्याची गरज असल्याचे संदीप शेळके म्हणाले. याशिवाय बुलडाणा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी विशेष अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही संदीप शेळके म्हणाले.
राजकीय इच्छाशक्ती असेल तर या गोष्टी अश्यक्य नाहीत असेही ते यावेळी म्हणाले.