लोणार तालुक्यात वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेचे दणक्यात स्वागत; संदीप शेळकेंचे सत्ताधारी खासदारांवर टीकास्त्र! म्हणाले, त्यांनी जिल्ह्याची वाट लावली...

 
लोणार
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विद्यमान खासदारांच्या १५ वर्षाच्या काळात जिल्हा विकासाच्या बाबतीत ५० वर्षे मागे गेला. लोणार, सिंदखेडराजा, संत नगरी शेगाव एवढं काही वैभव जिल्ह्याजवळ असुनदेखील नावालाही विकास दिसत नाही. केवळ लोकसभा सभागृहातील खुर्च्या उबवण्याच काम यांनी केलं का? असा सवाल करीत गेल्या १५ वर्षात जिल्ह्याच्या विकासाची वाट लावण्याचं काम खासदारांनी केलं असा घणाघात वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केला. वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा २० मार्चच्या सायंकाळी लोणार तालुक्यात दाखल झाली. यावेळी पिंपळनेर, जांबुल, देऊळगाव वायसा, वढव, आरडव, दाभा, गुंधा, वेणी या गावांत झालेल्या कॉर्नर सभेत संदीप शेळकेंनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना संदीप शेळके यांनी त्यांनी सुरू केलेल्या वन बुलडाणा मिशन या राजकीय लोकचळवळीची भूमिका विषद केली. जिल्ह्याचा सर्वांगीण ,सर्वव्यापी आणि तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणारा विकास आपल्याला अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभी राहिली आणि उद्योगधंदे वाढले तर रोजगाराची संधी निर्माण होईल, पर्यायाने पुण्या मुंबईकडे जाणारा तरुणांचा ओघा थांबेल असे संदीप शेळके म्हणाले. शेतकऱ्यांना २४ तास वीज आणि पाणी हा विषय आपल्या अजेंड्यावर असून शेतमालाच्या भावासाठी देशाच्या संसदेत आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. 
  लोणार, सिंदखेडराजा, शेगाव, ज्ञानगंगा अभयारण्य, अंबाबारवा अभयारण्य या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही संदीप शेळके म्हणाले. बुलडाणा जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसून टाकण्यासाठी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन गरजेचे असल्याचे सांगत आपल्याला मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.