वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद!

संदीप शेळके म्हणाले, तुम्ही आशीर्वाद द्या, मी विकास कशाला म्हणतात ते दाखवुन देतो; खासदारांनाही सुनावले खडे बोल...
 
सिंदखेडराजा
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ सिंदखेडराजा ही पावन पुण्यभूमी आहे. या भूमीने महाराष्ट्राला मासाहेब जिजाऊ दिल्या, जिजाऊंच्या पोटी स्वराज उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. मात्र पुढाऱ्यांनी केवळ राजकारणापुरता महाराजांच्या नावाचा वापर केला. एवढं ऐतिहासिक महत्व असून देखील सिंदखेडराजा नगरीचा विकास नाही. आराखड्यावर आराखडे येतात मात्र ते कुणाच्या घशात जातात? असा सवाल करीत तुम्ही मला आशीर्वाद द्या मी तुम्हाला विकास म्हणजे काय असते ते दाखवुन देतो असे प्रतिपादन वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले. वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा २२ मार्चला मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात दाखल झाली, यावेळी विविध गावांत शेळके यांनी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
  पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, विकास म्हणजे केवळ रस्ते, नाल्या,सभामंडप नाही. पुढाऱ्यांना ज्यातून टक्केवारी मिळते त्यालाच ते विकास समजतात. जिल्ह्याच्या रोजगाराच्या मुद्द्यावर विद्यमान खासदारांनी किती वेळा संसदेत आवाज उठवला? शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या धोरणावर किती वेळा आवाज उठवला? असा सवाल त्यांनी केला. दिल्लीत काय तुम्हाला खुर्च्या उबवण्यासाठी पाठवले का असेही संदीप शेळके म्हणाले.
यावेळी संदीप शेळके यांनी त्यांनी सुरू केलेल्या वन बुलडाणा मिशन या राजकीय लोकचळवळीची भूमिका विषद केली. जिल्ह्याचा सर्वांगीण ,सर्वव्यापी आणि तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणारा विकास आपल्याला अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभी राहिली आणि उद्योगधंदे वाढले तर रोजगाराची संधी निर्माण होईल, पर्यायाने पुण्या मुंबईकडे जाणारा तरुणांचा लोंढा थांबेल असे संदीप शेळके म्हणाले. शेतकऱ्यांना २४ तास वीज आणि पाणी हा विषय आपल्या अजेंड्यावर असून शेतमालाच्या भावासाठी देशाच्या संसदेत आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. 
  लोणार, सिंदखेडराजा, शेगाव, ज्ञानगंगा अभयारण्य, अंबाबारवा अभयारण्य या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही संदीप शेळके म्हणाले. बुलडाणा जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसून टाकण्यासाठी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन गरजेचे असल्याचे सांगत आपल्याला मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.
    या गावांत झाला जागर..
मोताळा, शेगाव, संग्रामपूर, खामगाव, मेहकर, लोणार या तालुक्यांचा प्रवास पूर्ण करून २२ मार्चला यात्रा सिंदखेडराजा तालुक्यात पोहचली. सावखेड तेजन, आडगाव राजा, वडाळी, सुलजगाव, धांदरवाडी, वसंतनगर, डावरगाव, अंचली, बुट्टातांडा, धानोरा, चांगेफळ, रुम्हणा, सोयंदेव या गावांतील मतदारांशी संदीप शेळकेंनी संवाद साधला.