Amazon Ad

वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेची आज संग्रामपूरात सांगता सभा! परिवर्तन रथयात्रेचा ३ तालुक्यांचा दमदार प्रवास; संदीप शेळके म्हणाले, आता जनतेनं ठरवलय..!

 
संग्रामपूर(एकनाथ औताडे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या नेतृत्वात निघालेली परिवर्तन रथयात्रा सध्या संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. तालुक्यातील ७० गावांचा प्रवास केल्यानंतर आज सायंकाळी संग्रामपूर येथे परिवर्तन रथयात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वन बुलडाणा मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.
  १० फेब्रुवारीला मोताळा तालुक्यातील नळकुंड येथून परिवर्तन रथयात्रेला प्रारंभ झाला होता. मोताळा तालुक्यातील गावोगावचा प्रवास केल्यावर यात्रा शेगाव आणि त्यानंतर संग्रामपूर तालुक्यात पोहचली. संग्रामपूरात महिला मेळावा, त्यानंतर बाईक रॅली, वानखेड, आवार, वरवट खंडेराव, पातूर्डा येथील दमदार सभा तालुक्यातील राजकारण ढवळून काढणाऱ्या ठरल्या. यात्रेदरम्यान संदीप शेळके यांनी बेरोजगार तरुण, मजूर, शेतमजुरी करणाऱ्या महिला, कास्तकार यांच्या बांधावर जाऊन भेटी घेतल्या. गावागावात संदीप शेळके यांचे दिमाखात स्वागत झाले. गावोगावच्या सभेत संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी परिवर्तनाची गरज विषद केली, जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन मांडले. जिल्ह्यातील जनतेने आता खूप सोसलय त्यामुळे आता राजकीय परिवर्तन ठरलय असं संदीप शेळके यांनी म्हटल आहे. दरम्यान आज सायंकाळी संग्रामपूर तालुक्याची सांगता सभा होणार असून त्यानंतर यात्रा जळगाव जामोद तालुक्याच्या प्रवासाला निघणार आहे.