वन बुलडाणा मिशनची उद्या, २२ ऑक्टोबरला बुलडाणा परिवर्तन पदयात्रा! जिल्ह्याच्या विकासासाठी दोन शक्तीपीठांना घालणार साकडे;
बुलडाण्याची जगदंबा आणि चिखलीच्या रेणुका मातेच्या चरणी होणार नतमस्तक; बुलडाणा लाइव्ह वर पाहता येणार थेट प्रक्षेपण! कसा आहे संपूर्ण कार्यक्रम वाचा....
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके २२ ऑक्टोबरला म्हणजे अष्टमीला बुलढाणा परिवर्तन पदयात्रा काढणार आहेत. बुलढाणा ते चिखली अशी २५ किलोमीटरची ही पदयात्रा आहे. बुलढाण्याची माता जगदंबा आणि चिखलीचे आराध्य दैवत रेणुका मातेच्या चरणी ते नतमस्तक होणार आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी या दोन शक्तीपीठांना साकडे घालण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास या एकमेव ध्येयाने वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत आहे. यामाध्यमातून जाहीरनामा जनतेचा या कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर संवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा मांडतात. त्यामध्ये जनतेला काय अपेक्षित आहे, याचा विचार केला जात नाही. त्यामुळे संदीप शेळके जनतेचा जाहीरनामा मांडणार आहेत. जिल्ह्याच्या विकासाबाबत जनतेतून सूचना, कल्पना गोळा करण्यात येणार आहेत. हा असेल जनतेचा जाहीरनामा. यासाठी त्यांचा जिल्हा दौरा सुरु आहे. बुलडाणा लाइव्ह च्या यु ट्युब चॅनेल वर या यात्रेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
जिल्ह्यात शेती, सिंचन, रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, संगीत, क्रीडा, साहित्य आदी सर्वच प्रश्नांवर काम करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे मत ते व्यक्त करीत आहेत. त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी बालगोपाल त्यांचे स्वागत करतांना दिसतात. माता- भगिनिंची सभांना भरगच्च उपस्थिती असते. युवा,ज्येष्ठ नागरिक, नोकरदार असे सर्वच स्तरातील मंडळी हजेरी लावत आहेत. परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होण्याच्या संदीप शेळके यांच्या आवाहनाला जनता जनार्दनाचा उत्स्फूर्त मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
मागासलेपणाचे सीमोल्लंघन करण्याची घेणार शपथ
बुलढाणा हा राज्यातील एक मागासलेला जिल्हा असल्याचा वारंवार उल्लेख येतो. या गोष्टीची प्रत्येक जिल्हावासीयांना खंत आहे. हे मागासलेपण दूर करुन विकासात जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत आहे. प्रभू श्रीरामांचा विजयोत्सव म्हणजे विजयादशमी. यावेळी त्यांनी दिग्विजयासाठी सीमोल्लंघन केले होते. त्याचप्रमाणे जगदंबा माता आणि रेणुका माता या दोन शक्तीपीठांना साकडे घालून वन बुलढाणा मिशनचे सदस्य जिल्ह्याच्या मागासलेपणाचे सीमोल्लंघन करण्याची शपथ घेण्यात येणार आहे.
कृषी, अध्यात्मिक संस्कृतीचे घडणार दर्शन
बुलढाणा परिवर्तन पदयात्रा ही बुलढाणा ते चिखली अशी २५ किलोमीटरची असणार आहे. बुलढाणा येथे सकाळी सहा वाजता संदीपदादा शेळके यांच्या हस्ते जगदंबा मातेची आरती करण्यात येईल. त्यांनतर यात्रेला सुरुवात होईल. या पदयात्रेत कृषी आणि आध्यात्मिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचा गजर करीत अनेक भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. भजन, कीर्तन, अभंग म्हणत ही पदयात्रा मार्गस्थ होणार आहे. या पदयात्रेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.