काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीची एकजूट! चुकीचे गुन्हे खारीज करण्याच्या मागणीचे एसपींना निवेदन;
यावेळी बोलतांना हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलिसांनी कुणाचे गुलाम म्हणून काम करू नये असा टोला लगावला. राहुल बोंद्रेंच्या दिवंगत वडिलांविरुद्ध पोस्ट करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याविरुद्ध पोलिसांनी काय कारवाई केली असा सवाल करीत भाजपची हीच संस्कृती असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि त्या भाजप कार्यकर्त्याने दिलेली तक्रार वाचून कुणालाही हसू येईल. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी जी तत्परता दाखवली तशी तत्परता जिल्ह्यात बोकाळलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी दाखवावी असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यात लक्ष घालून खोटे गुन्हे मागे घ्यावे, खोटे गुन्हे दाखल करण्यात ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणीही सपकाळ यांनी केली. पोलिसांनी दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले, न्यायालयाने मात्र एका दिवसात अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायव्यवस्थेने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांना दिलेली ही सणसणीत चपराक आहे असेही सपकाळ म्हणाले. पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन खोटे गुन्हे खारीज करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.