जिल्ह्यासाठी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधवांकडून मोठी घोषणा; जिल्ह्यात शासकीय आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला मान्यता देणार!
राज्याला म्हणाले, परिपूर्ण प्रस्ताव पाठवा, येणाऱ्या अधिवेशनात काम मार्गी लावू...
Jun 20, 2024, 08:37 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हयातील नागरीकांना आयुर्वेदीक पध्दतीने उपचार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातुन शासकिय आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयास सुरु करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात मंजुरात मिळवून देतो असे केंद्रिय आयुष व आरोग्य कुटूंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगीतले. यासंदर्भातील परिपुर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा असेही त्यांनी यावेळेस सांगीतले. काल,बुधवारी ना.प्रतापराव जाधव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली,यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा झाली.
आयुर्वेद ही सुमारे ३००० वर्षापासुन चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. भारतात अतिप्राचीन काळापासुन आयुर्वेदिक पध्दतीने उपचार केले जातात. विश्वाला आयुर्वेदीक उपचार पध्दतीची देण भारताने दिली आहे. आयुर्वेदिक उपचार पध्दतीने अनेक व्याध्याही दुरुस्त होतात. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार पध्दतीकडे अनेक नागरीकांचा कल असतो परंतु सर्वसामान्यांना विनामुल्य उपचार पध्दती उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातुन बुलडाणा जिल्हयात शासकिय आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयास सुरु करावे अशी अनेक दिवासांची मागणी आहे. आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करणारे शासकिय रुग्णालय जिल्हयात कार्यान्वीत नाही. जिल्हयातील अनेक नागरीकांना आयुर्वेदिक पध्दतीने उपचार घेण्याची इच्छा असते. परंतु बुलडाणा जिल्हयातील नागरीकांना आयुर्वेदिक पध्दतीने उपचार घेण्यासाठी इतरत्र जावे लागते. बुलडाणा जिल्हा हा थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिध्द आहे. जिल्हयात अंबाबरवा व ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये मोठया प्रमाणावर आयुर्वेदिक वनस्पतीही अस्तित्वात आहेत. त्याचा उपयोगही आयुर्वेदासाठी होऊ शकतो. जळगाव जामोद, संग्रामपुर आणि मेहकर या तालुक्यात आदिवासी बहुल समाजाचे वास्तव आहे. येथील आदिवासी बांधव हे आयुर्वेदिक चिकीत्सेवर विश्वास ठेवणारे असुन जिल्हयातील नागरीकांनाही अतिप्राचीन आयुर्वेदीक उपचार सुविधा मिळणाच्या दृष्टीकोनातुन बुलडाणा जिल्हयात शासकिय आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करावे अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आमदार संजय रायमुलकर, आणि संजय गायकवाड यांनी केली होती. दरम्यान केंद्रिय आयुष व आरोग्य कुटूंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात काल १९ जुन रोजी सदिच्छा भेट झाली. या भेटी दरम्यान दोन्हीही आमदार महोदयांनी शासकिय आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय संदर्भातील प्रश्न या सदिच्छा भेटीमध्ये उपस्थित केला. त्यावेळी राज्यसरकारच्या वतीने शासकिय आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करण्याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मंजुरात देऊन त्यांसदर्भातील परिपुर्ण प्रस्ताव केंद्रसरकारच्या आयुष मंत्रालयाकडे पाठवा येणाऱ्या अधिवेशनामध्येच या प्रस्तावाला मंजुरात प्राप्त करुन देतो अशी ग्वाही केंद्रिय आयुष व आरोग्य कुटूंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली.