संदीपदादा शेळकेंच्या मार्गदर्शनात गजानन येवले उर्फ नानांनी घेतला तंटामुक्तीचा वसा! ईसोलीकर म्हणतात असा तंटामुक्ती अध्यक्ष होणे नाही..

 

ईसोली(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गाव हेच माझे घर आणि गावातील प्रत्येक नागरिक माझ्या घरातील सदस्य अशी भूमिका तंटामुक्ती अध्यक्ष गजानन येवले उर्फ नाना यांनी घेतली आहे. वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनात नानांनी आपल्या आदर्श कार्यपद्धतीने सर्वांना आपलेसे केले आहे. शेतीचा असो की घरगुती वाद, मुलींच्या सासरच्या कटकटी असो की लोकांच्या पोलीस स्टेशनच्या भानगडी नानांनी स्वतः लक्ष घालून मार्गी लावल्या. त्यामुळेच असा तंटामुक्ती अध्यक्ष होणे नाही अशा भावना ईसोलीकर बोलून दाखवतात. 

गतवर्षी २६ जानेवारीला ईसोली ग्रामपंचायतने तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभेला उपस्थित असंख्य नागरिक अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक होते. जवळपास साडेतीनशे ते चारशे ग्रामस्थ प्रत्यक्ष ग्रामसभेला हजर होते. परंतु ज्यावेळी इसोलीमधून गजानन येवले उर्फ नाना यांना तंटामुक्ती अध्यक्ष करायचे अशी विनंती सरपंचांनी केली त्यावेळी कुणीच विरोध केला नाही. सर्वांनी एकमताने होकार दिला. गजूभाऊच्या विरोधात कुणीच उभं राहायचं नाही ही भावना घेऊन नानांना बिनविरोध निवडून आणले. गावकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत नानांनी तंटामुक्तीचा ध्यास घेतला. 
गजाननभाऊ उर्फ नाना असे पहिले तंटामुक्ती अध्यक्ष आहेत की, एक फोन लावला तर पाच मिनिटात हजर होतात. जिथे वाद आहे, जिथे तंटा आहे तिथे उपस्थित राहतात. गाव माझे घर आहे आणि या गावातील प्रत्येक व्यक्ती माझ्या घरातील सदस्य आहे, असे ते मानतात. कोणताही वाद सोडतांना अगदी आपल्या घरातल्या माणसाचा वाद सोडवावा तसे लक्ष घालतात. कधी शेताच्या धुऱ्याचा रस्ता असेल, कोणाच्या सोयरीकीचा वाद असेल नानांनी मार्गी लावला. असंख्य वेळा असे होते की, काही कारणाने सोयरीक तुटायची वेळ येते. तेंव्हा नानांनी मुलीकडच्या मंडळीची बाजू घेऊन समझोता घडवला. तंटामुक्ती अध्यक्ष म्हटलं की राजकीय पद आलंच. परंतु त्यांनी कधीच राजकारणासाठी आणि दोन मतासाठी अयोग्य न्याय दिला नाही. भांडण तंटा होऊन माहेरी गेलेल्या अनेक मुलींना त्यांनी सासरी आणले. आज त्यांचे संसार गुण्यागोविंदाने सुरु आहेत.
गजाननभाऊंनी कधी जातीपातीचा विचार केला नाही. ईसोलीत १९ पोटजातीचे लोक राहतात. परंतु हे गाव माझं घर आहे आणि गावातील प्रत्येक व्यक्ती हा माझ्या घरातील सदस्य आहे, या भावनेने गजाननभाऊ येवले काम करतात. अनेकदा पोलीस स्टेशनला गेलेले रिपोर्ट सुद्धा त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आपसात केले. शेकडोच्या प्रमाणात होणाऱ्या पोलीस तक्रारी अगदी बोटावर मोजण्या एवढयावर आणल्या. नानांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचा स्वभाव यामुळे असा तंटामुक्ती अध्यक्ष होणे नाही असे गावकरी म्हणतात.....