उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची बुलडाणा तालुका बैठक उत्साहात! नरेंद्र खेडेकर शिवसैनिकांना म्हणाले, निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक कामावर भर द्या !

जालिंधर बुधवतांनी केले गावागावात तयारीला लागण्याचे आवाहन..

 
shivsena

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून भाजपने राज्यामध्ये जे काही घडून आणले, ते सत्य प्रत्येकाला दिसून आले आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नातं अभेद्य आहे. त्यामुळे येणारा काळ हा कसोटीचा असला तरीही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम जनमानसाच्या मनावर कोरल्या गेले आहे. त्याचा फायदा निश्चितच निवडणुकांमध्ये आपल्याला होणार आहे. आपल्याला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी संघटनात्मक कामावर भर द्यावा लागेल, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केले.

ठाकरे शिवसेनेची बुलडाणा तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक १ डिसेंबरला शेतकरी भवन येथे पार पडली. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटिका जिजाताई राठोड, जिल्हा संघटक प्रा. सदानंद माळी, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, माजी तालुकाप्रमुख डॉ. मधुसूदन सावळे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख अशोक गव्हाणे, गजानन उबरहंडे, माजी सभापती सुधाकर आघाव, युवा सेना उपजिल्हाप्रमुख डॉ. अरुण पोफळे, शहरप्रमुख हेमंत खेडेकर, उपतालुकाप्रमुख विजय इतवारे, अमोल शिंदे, सुनील गवते, यांची उपस्थिती होती. 


गावागावांत तयारीला लागा : जालिंदर बुधवत

न.प., जि.प.च्या निवडणुका झाल्या नाहीत. आता थेट लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होतील, असे चित्र आहे. शिवसेना ही कायम समाजहितासाठी काम करत आली आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाच्या तत्त्वावर आपल्याला काम करायचे असून येणाऱ्या निवडणुकांसाठी गावागावात जाऊन तयारी करा, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी पदाधिकाऱ्यांना केले. तालुकानिहाय आढावा घेण्यात येणार असून आगामी काळातील पक्षाची रणनीती, पक्ष संघटन मजबूत करणे, बुथ प्रमुखांचे कार्य, बीएलए यांच्या नियुक्त्यांसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.