उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चिखली तालुक्यात लवकरच मोठा धक्का! मेरा खुर्द सर्कल मधील पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत शिरणार? आधी शिंदेंना म्हणत होते गद्दार..
महाविकास आघाडीत राहून आपले काही खरे नाही. विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने पुढील निवडणुकीत जागा त्यांनाच सुटेल याची खात्री असल्याने सिंदखेडराजा विधानसभेचे माजी आमदार शशिकांत खेडेकरांनी "हिंदुत्वाचा मुद्दा" पुढे करून शिंदेंची साथ धरली. मात्र असे असले तरी मतदारसंघात येणाऱ्या मेरा खुर्द जिल्हा परिषद सर्कल मधील बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने होते. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेत राहुन "विकास" होणार नाही अशी या पदाधिकाऱ्यांची खात्री झाली. शशिकांत खेडेकर आमदार नसले तरी त्यांच्या शब्दाला मुख्यमंत्री शिंदेकडे वजन आहे, त्यामुळे ते अनेक कामे मार्गी लावू शकतात असे शिंदे गटाच्या उंबरठयावर असलेल्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत मेरा खुर्द सर्कल मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे बरेच पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी - माजी सरपंच शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहे. पक्षप्रवेशाच्या पूर्वतयारीची बैठक माजी आ. शशिकांत खेडेकरांच्या उपस्थितीत देऊळगाव राजा येथे झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. खा. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा होण्याची शक्यता आहे.