खा.प्रतापराव जाधवांच्या होमग्राउंडवर उध्दव ठाकरेंची तुफान बॅटिंग! खासदारांवर हल्लाबोल,म्हणाले, मला वाटल हा बाबा बरा आहे,पण पाठीत खंजीर खुपसला!
उमेदवार घोषित केलाच नाही; जो देईल त्याला विजयी करा म्हणाले! खा.संजय राऊत म्हणाले, इथल्या खासदार आमदारांनी शिवसेनेच्या नावावर प्रॉपर्टी वाढवली; विश्व हिंदू परिषदेची जमिन बळकवणारे रामभक्त आहेत का? नरेंद्र खेडेकरांचा सवाल
Mar 20, 2024, 17:34 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर येथील नगरपरिषदेसमोरील मैदानावर आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जंगी सभा झाली. त्याआधी झालेल्या सिंदखेडराजाच्या तुलनेत मेहकर येथील सभेत भक्कम गर्दी जमली. या सभेत उध्दव ठाकरे यांनी शिंदेगटात गेलेल्या विद्यमान खासदार आणि आमदारांवर तुफान हल्ला चढवला. मला वाटलं हा बाबा बरा आहे, एक जिल्हा सांभाळतो.आमदारांची तिकीट विचारून देत होतो पण त्यांनी पाठीत खंजीर खुपसला . केवळ माझ्याच नाही तर शिवसैनिक मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात उध्दव ठाकरेंनी केला. दरम्यान मेहकरच्या सभेत देखील त्यांनी उमेदवाराची घोषणा केली नाही.पण मी जो उमेदवार देईल त्याला विजयी करण्याचा शब्द द्या तरच मी प्रचाराच्या सभेला येईल असे उध्दव ठाकरे भाषणाच्या शेवटी म्हणाले.
धर्मवीर स्व.दिलीप रहाटे यांचे स्मरण करून उध्दव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. दिलीप रहाटेंनी लावलेल्या वृक्षाचे फळे चाखून तुम्ही पदे भोगली आता फटके खा असे उध्दव ठाकरे स्थानिक खासदार ,आमदारांना उद्देशून म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते धबधब्यासारखे पैसे वाटतील, त्यांच्याकडे संपत्ती आहेच पण माझ्याकडे जनसंपत्ती आहे असे उध्दव ठाकरे म्हणाले.
त्यांनी शिवसेनेच्या नावावर प्रॉपर्टी वाढवली: खा.संजय राऊत
यावेळी बोलतांना खा.संजय राऊत म्हणाले की,ज्यांना आमदारक्या, खासदारक्या मिळाल्या त्यांनी विकासाच्या नावाने बोंबा केल्या. शिवसेनेच्या नावावर स्वतःची प्रॉपर्टी वाढवली असा आरोप त्यांनी नाव न घेता खासदार ,आमदारांवर केला.
शिवसेनेशी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करू नये ,तुम्ही गुंड असाल तर आम्ही महागुंड आहोत. पण आमची गुंडगिरी विधायक कामासाठी आहे असे खा.संजय राऊत म्हणाले. या भागातील आमदार आणि खासदारांना पेन्शन लागू होणार आहे, कारण तुम्ही त्यांना घरी बसवणार आहात असेही खा.राऊत म्हणाले. ज्यांच्या नावावर ते दादागिरी करत आहात ते मोदी आणि शहा देखील सत्तेत राहणार नाही,कारण आता इंडीया आघाडीचं सरकार येणार आहे असे खा. संजय राऊत म्हणाले.
जमिनी बळकावणारे रामभक्त आहेत का?- नरेंद्र खेडेकरांचा सवाल
२६ एप्रिलला बुलडाणा जिल्ह्याच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जिल्हा अविकसित ठेवण्याचे काम खासदारांनी केलं. एक हजार कोटींचे मालक खासदार झाले पण जिल्ह्याचा विकास झाला नाही. या गावात विश्व हिंदू परिषदेच्या जमिनी बळकवणारे रामभक्त आहे का? असा सवाल शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला.