तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला देऊळगावराजा तालुक्यात तुफान प्रतिसाद; ठिक-ठिकाणी जंगी स्वागत!

गारपिटग्रस्त भागाची तुपकरांकडून पाहणी; शेतकऱ्यांना दिला धीर! उद्या चिखलीत तुपकरांच्या समर्थकांची तातडीची बैठक; मोठी घोषणा करणार?
 
Tupkar
देऊळगाव राजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): - शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची निर्धार परिवर्तन यात्रा आता घाटाखालील दौरा पूर्ण करून घाटावर पोहोचली आहे. चिखली तालुक्याच्या झंझावाती दौऱ्यानंतर दहाव्या दिवशी ही निर्धार परिवर्तन यात्रा देऊळगावराजा तालुक्यात पोहोचली. देऊळगावराजा तालुक्यातील जनतेने या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर दिला. 
  निर्धार परिवर्तन यात्रेच्या दहाव्या दिवशी ३ मार्च रोजी देऊळगावराजा तालुक्यात धडकली. तालुक्यातील टाकरखेड भागीले, पांगरी, सिनगाव जहाँगिर, गारगुंडी, मेहूणाराजा, रोहणा, निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, साठेगाव, निमगाव वायाळ, वाघजई, जळगाव, पिंपळगाव, गोंधनखेड, आळंद या ठिकाणी भेटी देऊन रविकांत तुपकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. या निर्धार यात्रेदरम्यान प्रत्येक गावात गावकऱ्यांनी रविकांत तुपकर यांचे अतीशय आपुलकीने स्वागत केले. ठीक ठिकाणी सत्कार करण्यासोबतच या निर्धार परिवर्तन यात्रेला समर्थन नागरिकांनी दिले. गेल्या 22 वर्षांपासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता आणि तरुणांसाठी लढणाऱ्या या योध्याला आता लोकसभेच्या निवडणूकीत जोरदार पाठिंबा देण्याचा निर्धार नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.
               मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने या भागात शेडनेट व पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल होवून रोहणा येथील शेतकरी स्व.विठ्ठल जनार्दन डोके यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविकांत तुपकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटूंबियांचे सांत्वन केले व त्यांना मदत मिळणेसंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली. 
            यावेळी कुलदीप करपे, मधुकर शिंगणे, शेख जुल्फेकार, बबनराव चेके, वसंतराव पाटील, संतोष शिंगणे, कृष्णा शिंगणे, भगवान पालवे, सहदेव लाड, राम अंभोरे, प्रदीप हिवाळे, अरुण भागीले, सचिन भागीले यांच्या मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चिखलीत बैठक; तुपकरांच्या घोषणेकडे लक्ष
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात निर्धार परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. घाटाखालील चार तालुके पिंजून काढून ही यात्रा आता घाटावर चिखली आणि देऊळगावराजा या दोन तालुक्यांमध्ये धडकली आहे. प्रत्येक ठिकाणी रविकांत तुपकरांच्या या निर्धार परिवर्तन यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान ५ मार्च रोजी चिखली येथे मौनी बाबा संस्थान मध्ये कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थकांचा तातडीची बैठक आयोजित केली आहे. यावेळी रविकांत तुपकर कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. दरम्यान या तातडीच्या मेळाव्यात आता तुपकर कोणता राजकीय निर्णय घेतात, कोणती भूमिका जाहीर करतात याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून आहे, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.