तुपकरांची आजची रात्र रुग्णालयातच!
अतिदक्षता विभागात उपचार सुरू; कार्यकर्त्यांची गर्दी कमी होईना
Nov 20, 2021, 22:42 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग मागे घेतल्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात तयार केलेल्या विशेष अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्रकृती अद्याप खालावलेलीच असल्याने आज, २० नोव्हेंबरची रात्र त्यांना दवाखान्यातच काढावी लागणार आहे.
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी १७ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आज पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तुपकरांना आज व उद्या केवळ द्रवस्वरूपातील पदार्थ देण्यात येणार आहेत. तब्येतीत सुधार झाल्यास २२ नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळू शकतो, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तुपकरांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असले तरी त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा व शेतकऱ्यांचा गराडा कायम आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते तुपकरांना भेटण्यासाठी जिल्हा रुग्णालयात येत होते. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे जिल्हा रुग्णालयात परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.