उद्या शेतकऱ्यांचे चलो सिंदखेडराजा! रविकांत तुपकरांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन! सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती प्रश्नांवर आंदोलन पेटणार...
Sep 3, 2024, 14:14 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) - सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, यासह शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे.उद्या,४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजेपासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकर बेमुदत अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करणार आहे. तुपकरांच्या या आंदोलनास समर्थन देण्यासाठी शेतकऱ्यांनी "चलो सिंदखेड राजा"चा नारा दिला आहे. दरम्यान आंदोलनाकडे शासनाने लक्ष न दिल्यास हे आंदोलन राज्यभर पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलने करीत आहोत पण सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकार आमचा हा शेवटचा अल्टिमेटम असून जर सरकारने ठोस निर्णय घेतले नाही तर मात्र ४ सप्टेंबर पासून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मग मात्र ते सरकारला जड जाईल असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला होता. परंतु अद्यापही शासनाने दखल न घेतल्यामुळे आता ते आंदोलन सुरू करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रविकांत तुपकरांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
गेल्या आठवड्यात रविकांत तुपकरांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाची हाक दिली होती, त्यावेळी आंदोलनासाठी जात असतांना मरीन ड्राईव्ह परिसरात त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटी येथे शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवून आंदोलन केले होते. त्यानंतर आता सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
राज्यभर आंदोलन पेटणार
रविकांत तुपकर अन्नत्यागाला बसल्यानंतर राज्यातील २७ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते या आंदोलनात उतरणार असून गावागावात आंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालवली आहे, त्यामुळे हे आंदोलन निश्चित पेटणार असून राज्य सरकारला अडचणीत आणणारे ठरणार आहे. हे आंदोलन जात, धर्म,पक्ष, संघटना विरहित असणार आहे, त्यामुळे आपल्या हक्कासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावे, असे आवाहन रविकांत तुपकरांनी केले आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्या..?
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला प्रत्यक्ष बांधावरील उत्पादन खर्चाच्या आधारे ५०% नफा या सूत्राप्रमाणे भाव मिळावा (उदारणार्थ गेल्या वर्षी सोयाबीन प्रत्यक्ष बांधावरील उत्पादन खर्च हा प्रति क्वि. ७२४० रु. होता. हा उत्पादन खर्च + ५०% नफा गृहीत धरून सोयाबीनला कमीतकमी प्रति क्वि.९००० रु. भाव मिळावा, तसेच कापसाला कमीतकमी १२५०० रु. भाव मिळावा.), गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात पिकविमा भरलेल्या सर्व (पात्र-अपात्र) शेतकऱ्यांना सरसकट १००% पिकविमा तात्काळ मिळावा, गेल्या वर्षीच्या सोयाबीन-कापसाला हेक्टरची मर्यादा न लावता प्रति क्वि. ३००० /- रु भाव फरक मिळावा, या वर्षीच्या म्हणजेच २०२४ च्या खरीप हंगामातील सोयाबीनला प्रति क्वि.९०००/- रु. व कापसाला प्रति क्वि. १२५००/- रु. भाव मिळण्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, शेतीला उद्योगाचा दर्जा देवून पूर्णवेळ वीज, पाणी, नवीन तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शेतीला सरकारने सौर उर्जेचे नाही तर सिमेंटचे,तारेचे मजबूत कंपाऊंड करून द्यावे, तसेच शेतीपिकांच्या नुकसान भरपाईत वाढ करावी, शेतकऱ्यांना सुलभतेने पेरणीपूर्व पिककर्ज उपलब्ध होण्याची व्यवस्था राज्य सरकारने उभारावी.
शेतमजुरांना सरकारकडून विमा सुरक्षा कवच व मदत मिळावी,महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत नियमित कर्ज भरणारे पण ५० हजार रु. प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहन अनुदान मिळावे, धानाला प्रति क्वि.२०००/- रु.बोनस मिळावे, संत्रा-मोसंबीच्या गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, विहरी व घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने द्यावे, फळबाग व सिंचन अनुदान तातडीने द्यावे, महा डी.बी.टी. अंतर्गत कृषि अवजारांचे थकलेले अनुदान तातडीने जमा करावे, शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांसंदर्भात सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई द्या...
गेल्या २ दिवसापासून राज्यात मोठा प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धरणे ओव्हर फ्लो झाल्याने नद्यांना पूर आल्याने शेतीपिकांचे, शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी जनावरेही दगावली आहे. त्यामुळे यासर्व झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई देण्याची मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.