"हा" बाबा खासदार झाला अन् जिल्हा विकासात ५० वर्षे मागे गेला! खासदार जाधवांच्या सासुरवाडीत संदीप शेळकेंचा हल्लाबोल
Mar 12, 2024, 17:26 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागच्या १५ वर्षात जिल्ह्याचा सत्यानाश झाला. विकासाच्या नावाने जिल्ह्यात बोंब आहे. केंद्राच्या योजना गल्लीत उतरल्याच नाही. इथे केवळ ठेकेदारांच हित जोपासल्या जाते. "हा" बाबा खासदार झाला अन् जिल्हा विकासाच्या बाबतीत ५० वर्षे मागे गेला असा घणाघात संदीप शेळके यांनी खासदार जाधवांचे नाव न घेता केला. आज,१२ मार्चला सकाळी वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा लोणी गवळी येथे पोहचली,यावेळी संदीप शेळके बोलत होते.
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्याला कुणी मागासलेलं म्हणत तेव्हा आम्हाला प्रचंड वेदना होतात. जिल्ह्यात सगळं काही आहे मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचे ते म्हणाले. मेहकर आणि लोणार तालुक्यात तर प्रचंड समस्या आहे. १५ वर्षे खासदारकी १५ वर्षे आमदारकी , राज्यमंत्री पद एवढं उपभोगुन देखील विकास का करता आला नाही असा सवालही यावेळी शेळके यांनी केला. जनतेने आपल्याला लोकसभेची संधी दिल्यास प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, शेतकऱ्यांना वीज, पाणी , तरुणांना रोजगार, शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग, महिला सक्षमीकरण, जिल्ह्याचे पर्यटन हे मुद्दे आपल्या अजेंड्यावर राहतील असेही संदीप शेळके म्हणाले..
मेहकर तालुक्यात परिवर्तनाचा संकल्प..!
वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला मेहकर तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळतोय. गावोगावी यात्रेचे दमदार स्वागत होत आहे. मेहकरची जनता प्रस्थापितांना कंटाळली आहे, इथल्या जनतेने सगळा जवळून अनुभव घेतला त्यामुळे जनतेने आता परिवर्तनाचा संकल्प केला आहे असे संदीप शेळके म्हणाले.
या गावांत झाला परिवर्तनाचा जागर..!
अंजनी, आंधृड, लोणी गवळी, वरूड, घाटबोरी, इसवी, पांगरखेड, विठ्ठलवाडी, बेळगांव, डोणगाव नागापूर या गावांत १२ मार्चला परिवर्तनाचा संकल्प करण्यात आला.