...."त्यांनी" एकनाथ शिंदेंना ठार मारण्याचा कट रचला होता! आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकनाथ शिंदे यांच्या जीवाला नक्षल वाद्यांकडून धोका होता. तशी जिवे मारण्याची धमकीही त्यांना दिली होती. मात्र याच संधीचा फायदा घेत एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा कट रचला गेला असा धक्कादायक आरोप बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. यासाठी त्यांनी आधीच्या सरकारवर बोट ठेवले आहे.

 आपण हा गौप्यस्फोट अतिशय जबाबदारीने करत आहोत असेही संजय गायकवाड म्हणाले. आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. हा कट कधी आणि कुणी रचला होता हे सांगताना देखील आमदार संजय गायकवाडांनी सूचक विधान केले असून महाविकास आघाडी सरकारमध्ये हा सगळा कट रचल्याचे आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे.

  एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांना नक्षल्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकारानंतर राज्य सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठीची बैठक तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी सुरू होती.

यावेळी एकाएकी मातोश्री वरून फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली. याचा अर्थ काय? ते त्यांना मारण्यासाठी टपलेले होते. त्यांना नक्षल्यांच्या हातून मारायचे होते, तीच त्यांचा डाव होता असे आमदार गायकवाड म्हणाले.