Amazon Ad

जोरजबरदस्तीने भक्ती महामार्ग करणार नाही! शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करू; विरोध असेल तर प्रकल्प पुढे नेणार नाही! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सभागृहात स्पष्टीकरण

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा ते शेगाव या प्रस्थावित भक्ति महामार्गासाठी शेतकऱ्यांचा होत असलेला प्रचंड विरोध पाहता राज्य सरकारने दोन पावले मागे घेतली आहेत. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार श्वेताताई महाले आणि डॉ.राजेंद्र शिंगणे यांनीदेखील शेतकऱ्यांची बाजू घेत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली होती. आता यावर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर प्रकल्प पुढे नेणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केले. 
 भक्ती महामार्ग किंवा कोणताच महामार्ग जबरदस्तीने करण्यात येणार नाही. समृद्धी महामार्गाला देखील आधी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण केले. त्यामुळे आम्ही आताही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच काम करू, जोरजबरदस्तीने काम करणार नाही. शेतकऱ्यांच्या विरोध असेल तर आम्ही प्रकल्पाचे काम पुढे नेणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मात्र असे असले तरी त्यांनी महामार्ग रद्द करण्याची थेट घोषणा केलेली नाही..त्यामुळे प्रशासकीय पातळीवरून आता शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होतील असे बोलले जात आहे.