Amazon Ad

BREAKING आमदार संजय गायकवाड यांना माघार घेण्याची गरजच नाही! बाद झाला अर्ज; काय आहे कारण...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज ४ एप्रिलला पाच अर्ज बाद झाले आहेत. शेवटच्या टप्प्यात आपण माघार घेऊ असे म्हणणारे आमदार संजय गायकवाड यांना आता माघार घ्या अशी विनंती खा. जाधव यांना करावी लागणार नाही, कारण संजय गायकवाड यांचा अर्ज आपोआपच बाद झाला आहे. 
आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षाच्यावतीने अर्ज भरला होता. त्याच दिवशी संध्याकाळी खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली. दुसऱ्या दिवशी बुलढाण्यात झालेल्या मेळाव्यात अर्ज माघार घेण्याचे संकेतही आमदार गायकवाड यांनी दिले होते. मात्र आमदार गायकवाड यांना आता माघार घेण्याची गरजच उरली नाही कारण त्यांचा अर्ज बाद झाला आहे. शिवसेना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म संजय गायकवाड यांना फॉर्म सोबत जोडता आला नाही, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. आमदार गायकवाड यांच्या व्यतिरिक्त आणखी ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामध्ये भाजप नेते विजयराज शिंदे यांनी भाजपच्या वतीने भरलेला अर्ज रद्द झाला, मात्र त्यांनी अपक्ष भरलेला अर्ज कायम आहे. त्या व्यतिरिक्त श्याम बन्सीलाल शर्मा, ॲड.सैय्यद मुबीन अपक्ष उमेदवार यांच्या अर्जावर दहा सूचकांच्या सह्या अपेक्षित असताना केवळ ६ सूचकांच्या सह्या होत्या त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. बसपाने गौतम किसनराव मघाडे यांना उमेदवारी दिली, त्यांच्या पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर पर्यायी उमेदवार म्हणून विलास शंकरराव तायडे यांचे नाव होते. मात्र मुख्य उमेदवार गौतम माघाडे यांचा अर्ज पात्र ठरल्याने पर्यायी उमेदवार विलास तायडे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे आता रिंगणात २४ अर्ज उरले आहेत, ८ एप्रिल पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे रिंगणात कोण कोण असेल याचे चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.