...तर मतदान ठरेल अवैध! मतदारांच्या 'पसंती'वर ठरणार एमएलसीचा आमदार

Buldana Live Exclusive : पारंपरिक पद्धतीने मतदान!! ८२२ सदस्यांना घ्यावी लागणार कमालीची दक्षता
 
 
file photo

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोकसभा ते थेट ग्रामपंचायत निवडणुकीत वापर होणाऱ्या इव्हीएम मशीनच्या वापरावरून बहुतेक निवडणुकीत वादंग निर्माण होऊन सत्ताधारी व विरोधकांत आरोप-  प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडतात. त्याचे पडसाद निकालानंतरही उमटत राहतात. मात्र विधान परिषदेची निवडणूक यापासून अलिप्त राहणार हाय! याचे कारण म्हणजे या लढतीचे मतदान मतपेट्या आणि मतपत्रिकेचा वापर करून पारंपरिक पद्धतीने घेण्यात येते. यातही ही निवडणूक पसंतीक्रम पद्धतीने घेण्यात येत असल्याने हमखास "लक्ष्मी दर्शन' होणाऱ्या सदस्यांना सरस्वतीने दिलेल्या बुद्धीचाही वापर करून मतदान करावे लागणार आहे. यात थोडीही गफलत झाली तर त्यांचे मतदान वाया (अवैध ठरणार) जाणार आहे... होय! यामुळेच अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील ८२२ मतदारांना १० डिसेंबरला होणाऱ्या मतदानात आपला मतदानाचा हक्क काळजीपूर्वकच बजवावा लागणार आहे. २२ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे.

काय आहे पसंतीक्रम पद्धती...
मतदान करताना सदस्यांनी बॅलेट पेपरमधील पहिल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोरील "पसंतीक्रम नोंदवावा' या रकान्यात 1 हा आकडा नोंदवावा लागेल. तो एक असा अक्षरी लिहू नयेत. पहिल्या पसंतीचे मत नोंदविणे बंधनकारक असून, तसे नमूद न केल्यास मतदान अवैध ठरणार आहे. पहिल्या पसंतीचे मत एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहिता येईल. अन्य पसंतीक्रम जसे २, ३ लिहिणे, मतदारांच्या मनावर अर्थात ऐच्छिक असून तेदेखील २, ३ अशा आकड्यातच लिहावे लागणार आहे. आपली मतपत्रिका वैध ठरण्यासाठी पहिल्या पसंतीचे मत नोंदविणे आवश्यक आहे. मात्र एकच पसंतीक्रम दोन किंवा अधिक उमेदवारांसमोर लिहिता येणार नाहीये! तसे केल्यास मतपत्रिका अवैध ठरेल. याशिवाय मतपत्रिकेवर कोठेही सही, अद्याक्षरे, नाव अथवा कोणताही शब्द लिहल्यास , अंगठ्याचा ठसा उमटविल्यास मतदान वाया जाणार आहे.