...तर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या होऊ शकते 68! पंचायत समितीचे 136 गण!!
कोरोनाच्या प्रदीर्घ मुक्कामामुळे सन 2021 ची राष्ट्रीय जनगणना होऊ शकली नाही. यामुळे सध्याची अचूक वाढीव लोकसंख्या कळू शकत नाही. मात्र भारतीयांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेतले तर यात भरीव वाढ झाली असणार यात शंकाच नाही! यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सदस्यसंख्या वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय अलीकडेच शासनाने घेतला होता. नगरपरिषदेमधील सदस्यसंख्या वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच अ, ब आणि क वर्ग पालिकासाठी मार्गदर्शक तत्वे विशद करणारा अध्यादेश देखील काढण्यात आला. वाढीव वाॅर्डचे प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची सदस्य संख्या वाढविण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. वाढीव लोकसंख्या लक्षात घेतली तर बुलडाणा जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समित्यांचे गण 136 पर्यंत वाढण्याची चिन्हे आहे. मागील लढतीत 60 जि.प. गट तर 120 पं. स. गण होते. यात अलीकडेच वाढ होऊन ते अनुक्रमे 61 आणि 122 झाले होते.
आता ही संख्या आणखी वाढेल. वरिष्ठ सूत्रानुसार खामगाव, मेहकर, सिंदखेड राजा, चिखली सारख्या जास्त लोकसंख्येच्या तालुक्यात ही वाढ जास्त अपेक्षित आहे. यासंदर्भात अध्यादेश वा निर्देश जारी झाल्यावरच चित्र स्पष्ट होईल, असे या सूत्रांनी सांगितले. परिणामी गट व गणाची रचना बदलणार हे उघड आहे. मात्र देऊळघाट, साखरखेर्डा, धाड, डोणगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायती केंद्रबिंदू असणारे मतदारसंघ कायम राहतील.