कार्यकर्ता मेळावा गल्लीचा पण गप्पा दिल्लीच्या! महायुतीच्या मेळाव्यातील चित्र; उमेदवार जाहीर नसल्याने " महायुती जो देईल"

त्याचे काम करण्याचा निर्धार! डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक लीड देऊ...

 
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने तयारीच्या दृष्टीने आज देऊळगावराजा आणि मेहकरात महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. मेळाव्याला अपेक्षित असलेल्या जवळपास सर्वच नेत्यांनी या मेळाव्याला त्या त्या ठिकाणी हजेरी लावली. दरम्यान बुलडाणा लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला आणि उमेदवारी पुन्हा एकदा खा.जाधव यांनाच मिळणे जवळपास निश्चित असतांना देखील अद्याप अधिकृत  घोषणा न झाल्याने सर्वच नेत्यांची भाषणे केंद्र सरकार आधारीत कामांवर झाली. मोदी सरकारच्या लोकोपयोगी कामांचा पाढा वाचल्या गेल्या. पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाकरिता महायुती देईल त्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करण्याचा निर्धार  करण्यात आला. एकंदरीत अद्याप उमेदवार घोषित नसल्याने कार्यकर्ता मेळावा गल्लीचा पण गप्पा दिल्लीच्या असेच चित्र मेळाव्यात होते.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा मेळावा देऊळगावराजा येथील  महामना लॉन येथे पार पडला. या मेळाव्याला खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ राजेंद्र शिंगणे, आ.डॉ संजय कुटे, माजी खासदार सुखदेव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड . नाझेर काझी, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे  यांच्यासह सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

   पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षाच्या कार्यकाळात केलेला विकास हाच सर्वच नेत्यांच्या भाषणाचा विषय होता. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बुलडाणा लोकसभा मतदारसंघात महायुती जो उमेदवार देईल त्याचे काम करण्याचा संकल्प नेत्यांनी भाषणातून बोलून दाखवला. खा. प्रतापराव जाधवांनी देखील स्वतःच्या उमेदवारीबद्दल भाष्य करण्याचे टाळत लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विकासासाठी अजितदादा आणि महायुतीच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक लीड देणार असल्याचे अस. डॉ.शिंगणे म्हणाले.