घाटावरच्या जिल्हा भाजपात सगळा खेळ पांगला! भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे मनमानी करीत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप; मेहकरात जिल्हाध्यक्षांनी निवडला एक तालुकाध्यक्ष,

 जिल्हा उपाध्यक्षांनी दुसऱ्यालाच दिले नियुक्तीपत्र! युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांची निवडही जिल्हा उपाध्यक्षांकडून; म्हणाले निवडीचे अधिकार प्रदेशाकडून आम्हाला मिळाले! बुलडाण्याच्या शहराध्यक्षांच्या निवडीनेही नाराजीचा सूर;अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत....

 

बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "पार्टी विथ डिफरन्स" ही भाजपची ओळख.. "पथ का अंतिम लक्ष नही है सिहांसन चढते जाना, सब समाज को लिये साथ में आगे हैं बढते जाना..!" ही भाजपची कार्यकर्त्यांना शिकवण..मात्र आता जुनी भाजपा राहिली नाही, निष्ठावंतांना किंमत नाही अशी खदखद भाजपच्या  कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.. संघटनात्मक कामकाजाच्या सोयीने शासकीय बुलडाणा जिल्हाचे  घाटाखाली खामगाव आणि घाटावर बुलडाणा असे विभाजन करून भाजपने जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष दिले खरे.. मात्र ज्या उद्देशाने हे सगळ केलं त्या उद्देशांना हरताळ फासल्या जात असल्याचा आरोप होऊ लागलाय..घाटावर तर जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे मनात येईल तशा नियुक्त्या करीत असून अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय.मेहकर तालुक्यात तर जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे यांनी नेमलेले तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष अमान्य करीत जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद आण्णा लष्कर यांनी दुसऱ्या पदाधिकाऱ्यांची तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. शिवाय जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणुनही त्यांनी मेहकर तालुक्यातील बाभूळगावचे सरपंच शिवशंकर गायकवाड यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कोणते तालुकाध्यक्ष खरे अन् कोणते खोटे? नियुक्त्या करण्याचा खरा अधिकार कुणाचा असे सवाल उपस्थित होऊ लागले आहे. दुसरीकडे बुलडाणा शहराध्यक्ष म्हणून  डॉ मांटे यांनी विजयराज शिंदेंच्या जवळच्या व्यक्तीला आणि भाजपात नवीन असलेल्या व्यक्तीला नियुक्ती दिल्याची बाब बुलडाणा शहरातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागली असून ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते..

 जिल्हाध्यक्ष डॉ. मांटे यांनी मेहकर तालुकाध्यक्ष म्हणून सारंग माळेकर यांची नियुक्ती केली. दरम्यान हे वृत्त कळताच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर यांनी आधीचे तालुकाध्यक्ष  ॲड शिव ठाकरे यांची तालुकाध्यक्ष म्हणून फरनियुक्ती केली. शिवाय शहराध्यक्ष म्हणून प्रदीप इलग यांना नियुक्ती देण्यात आली.त्यामुळे आता भाजपचे मेहकर तालुकाध्यक्ष सारंग माळेकर की ॲड शिव ठाकरे असा सवाल उपस्थित होऊ लागलाय..दरम्यान यासंदर्भात बोलतांना जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद आण्णा लष्कर म्हणाले की" जिल्हाध्यक्ष नियुक्त्या करतांना मनमानी करीत आहेत, आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता शिवसेनेचा कार्यकर्ता असलेल्या व ज्याने भाजपात प्रवेशच घेतला नाही त्याला तालुकाध्यक्ष केले. आम्हाला जिल्हाध्यक्षांनी केलेल्या नियुक्त्या मान्य नाहीत. काय चालंलय ते आम्ही वरिष्ठांना कळवले आहे, त्यामुळे प्रदेश पातळीवरून आम्हाला नियुक्त्या करण्याचे अधिकार दिले आहे" असे ते म्हणाले. जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षांची नियुक्ती  आम्हीच करणार असल्याचे ते म्हणाले..

 बुलडाण्यात राजीनाम्याचे सत्र...

दरम्यान बुलडाणा शहराध्यक्ष म्हणून डॉ.गणेश मांटे यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांचे निकटवर्तीय एवढ्या एका निकषावर अनंता शिंदे यांची नियुक्ती केली असल्याचे भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. "जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे मनात येईल तंस वागतात. भाजपची एक पद्धत आहे त्या पद्धतीचे पालन त्यांनी केले नाही" असे एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना सांगितले. बुलडाणा शहरातील पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामा सत्र सुरू केले आहे..पुढच्या एक ते दोन दिवसांत भाजपचे बुलडाणा विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामे देण्याच्या तयारीत  असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले..