वनवासी बांधवांच्या उत्कर्षाचे काम आपल्या अजेंड्यावर! खा.प्रतापराव जाधव यांची ग्वाही; वसाली येथे भव्य फगवा उत्सवात वनवासी बांधवांशी साधला संवाद

 
संग्रामपूर
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डोंगर दऱ्यांमध्ये, वनामध्ये राहणारा वनवासी समाज हिंदु समाजाचे अविभाज्य अंग आहे. पुरातन काळापासून हा समाज आपल्या सनातन परंपरांचे रक्षण करीत आलेला आहे. आधीच्या संपुआ सरकारच्या काळात या समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचे पाप तत्कालीन संपुआ सरकारने केले.मात्र २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनवासी बांधवांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविल्या. आगामी काळातही वनवासी बांधवांचा उत्कर्ष हा विषय आपल्या अजेंड्यावर राहील असे प्रतिपादन खा.प्रतापराव जाधव यांनी केले. संग्रामपूर तालुक्यातील वसाली येथे वनवासी सेवा समिती जामोद द्वारा आयोजित भव्य फगवॉ संमेलनात ते बोलत होते.
वणवसी बंधुंसाठी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सेवाभावी संस्था,विविध आश्रमशाळा व शिक्षण संस्था यांचा प्रचंड विकास करण्यात आला आहे, हिंदुत्वाच्या जडणघडणीमध्ये प्रभू श्रीराम यांच्या वनवासातील दिवसामधे प्रभू श्रीराम यांना आपलेसे करणारे आदिवासी बांधव यांच्यासाठी विविध आदिवासी विकास सहकारी संस्थांची मांडणीच देशाचे सहकार मंत्री मा. श्री अमित शहा यांनी व शब्दाला जागणारे मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे यांनी केली आहे. वनवासी तरुण तरुणीच्या स्वयंरोजगार विकास व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध असून याअगोदर कधीच कुणी देशाच्या या मूळ राहिवासी असलेल्या समाजाला देशाच्या प्रगतीच्या,विकासाच्या कार्यात सहभागी करून घेतले नाही व ते कायम मागास कसे राहतील याचीच तजविज केली परंतु नरेंद्र मोदी सरकारमध्ये नवीन वन जमीन हक्क कायदा तसेच 'शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा' च्या माध्यमातून देशविकासामध्ये सबका साथ,सबका विकास हाच ध्यास असल्याचे ते आपल्या भाषणात म्हणाले.
   वनवासी सेवा समिती जामोद द्वारा वसाली येथे भव्य फगवॉ संमेलन व वनवासी बांधवांचा खेळकुद तथा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थित राहून खा.जाधव यांनी वनवासी बांधवांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, बजरंग दलाचे प्रांत संयोजक अमोलजी अंधारे, वनवासी कल्याण आश्रमाचे अधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी व वसाडी गावचे सरपंच व वनवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.