धिरज लिंगाडेंच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकजूट! भाजप, शिंदे गटाला ते जमल नाही

 
Bondre
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
तीन तिघाडी काम बिघाडी असा आरोप भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीवर केला गेला. तीन पक्षाचे आपसात जमत नाही, त्यांचा ताळमेळ नाही असा आरोप रणजित पाटील यांनीही प्रचारादरम्यान केला. मात्र दुसऱ्यांवर आरोप करतांना आपले घर सांभाळण्याचा शहाणपणा रणजित पाटील आणि भाजपला जमला नाही. त्याची परिणीती रणजित पाटलांच्या पराभवात झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकजुटीने भाजपला सणसणीत चपराक दिली.

तसे पाहता जागावाटपात अमरावती पदवीधर मतदार संघाची जागा काँग्रेसला सुटलेली..आधीच काँग्रेसमध्ये दोन ते तीन जण इच्छुक..त्याही परिस्थितीत चमत्कार व्हावा तसा शिवसेनेच्या धिरज लिंगाडेंना  काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात येऊन तिकीट देण्यात आले. १२ वर्षे मतदारसंघावर अधिराज्य गाजवणारा, गेल्या निवडणुकीत ७० हजारांपेक्षा अधिक पाहिल्या पसंतीची मते घेणारा रणजित पाटलांसारखा तगडा उमेदवार असताना धिरज लिंगाडे यांच्यासाठी ही निवडणूक निश्चितच सोपी नव्हती.  मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार करतांना जी एकजूट दाखवली ती निश्चितच लिंगाडे यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली. 


५ जिल्ह्यांचा मतदारसंघ असताना प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार पोहचणे शक्यच नव्हते. होम ग्राउंड असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात तर लिंगाडे मतदानाच्या आदल्या दिवशी आले. मात्र तोपर्यंत डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आ.हर्षवर्धन सपकाळ, नरेंद्र खेडेकर, दिलीपकुमार सानंदा, जयश्रीताई शेळके या सर्व नेत्यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच तालुके पिंजून काढले. इतर जिल्ह्यात जाऊनही या नेत्यांनी लिंगाडे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचे दिसले. त्या तुलनेत भाजप आणि शिंदे गटाचे नेते मात्र रणजित पाटलांसाठी मैदानात उतरले नाहीत. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तर उघडपणे आम्ही दौरे केले नाहीत, प्रचारासाठी फिरलो नाही हे सांगितले. अर्थात आम्हाला त्यासाठी उमेदवार किंवा भाजपने विश्वासात घेतले नाही असा आरोप करून त्यांनी रणजित पाटलांच्या जखमेवर मीठ चोळले.