सुशिक्षित बेरोजगारांचे वादळ आज बुलडाण्यात धडकणार! वंचित बहुजन युवा आघाडीचे आयोजन; जिल्हाध्यक्ष सतीश पवार करणार नेतृत्व! जिल्हाभरातील सुशिक्षित बेरोजगार बुलडाण्याकडे निघाले;

सतीश पवार म्हणाले, सरकारच्या डोक्यात सत्तेची नशा, ती आम्ही उतरवणार..
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज,१४ ऑगस्ट रोजी बुलडाण्यात सुशिक्षित बेरोजगारांचा भव्य एल्गार मोर्चा निघणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून वंचित बहुजन युवा आघाडीच्या या मोर्चाला जिल्हाभरातील हजारो सुशिक्षित बेरोजगार एकवटणार आहेत. सकाळी ११ वाजता बुलडाणा शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ चौकातून या मोर्चाला सुरवात होणार आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे .जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर या भागातील सुशिक्षित बेरोजगारांचा जत्था बुलडाण्याकडे निघाला आहे.
देशात ,राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची लोंढेच लोंढे आहेत. सरकारला त्यांचा विचार करायला वेळ नाही. सत्तेची नशा सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात भिंनली आहे. ती नशा उतरवण्याचे काम आता वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सतीश पवार आज, १४ ऑगस्टच्या सकाळी 'बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना म्हणाले.आजचा मोर्चा अभूतपूर्व होणार आहे. जिल्हाभरातील विविध संघटनांनी या मोर्चाला पाठींबा दिला आहे. आम्ही आमच्या हक्कांसाठी भांडत आहोत. सुशिक्षितांच्या हाताला काम आणि त्याबदल्यात त्यांच्या खिशात योग्य दाम यासाठी आमचा लढा असल्याचे सतीश पवार म्हणाले. सरकारला याचा विचार करावाच लागेल , आजच्या मोर्चानंतर सरकारला आम्ही वेळ देऊ मात्र त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मात्र त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असे सतीश पवार म्हणाले..!