संविधान जागर यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात! खोर गावातून झाला शुभारंभ; राहुल बोंद्रेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, म्हणाले, दिल्लीपासून गल्लीपर्यंत दादागिरी सुरू आहे...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वातील संविधान जागर यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज, २० फेब्रुवारीला सकाळपासून सुरुवात झाली. सकाळी चिखली तालुक्यातील खोर या "आदर्श" गावात राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात संविधान जागर यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला. त्याआधी राहुल बोंद्रे यांनी खोर गावातील महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन केले. यावेळी बोलतांना राहुल बोंद्रे यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला.
 देशात संविधान टिकले पाहिजे, संविधानाचा सन्मान झाला पाहिजे, कायद्याचे राज्य असावे या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी संविधान जागर यात्रेचा आम्ही शुभारंभ केला. मात्र त्यानंतर उदयनगरच्या सरपंचासह आमच्या १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, का तर आम्ही संविधान जागर यात्रेचा शुभारंभ केला म्हणून..असे राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले. त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्तेच्या जोरावर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत दादागिरी सुरू आहे, दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही थांबणार नाही कितीही गुन्हे दाखल केले तरी आपण लढणारच असा निर्धार यावेळी त्यांनी बोलतांना व्यक्त केला. पंजाबमधील शेतकरी आंदोलना विषयी बोलताना आंदोलक शेतकऱ्यांवर सरकारकडून अत्याचार झाल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले.
  संविधान जागर यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी खोर येथून पुढे यात्रा मार्गस्थ झाली. माळशेंबा, साकेगाव, वाघापूर ,भोगावती, तांबुळवाडी या गावात आज यात्रा पोहोचणार असून अंत्रीकोळी येथे पहिल्या दिवसाचा समारोप होणार आहे.