संविधान जागर यात्रेला गावागावात मिळतोय उदंड प्रतिसाद! रायपुरच्या सभेत राहुल बोंद्रेंचे घणाघाती भाषण; म्हणाले, भाजपवाल्यांचे दिवस भरलेत;

संविधान न मानणाऱ्या भाजपला जनता घरी बसवणार! आज,सातव्या दिवसाच्या यात्रेला पिंपळगाव सराई येथून सुरुवात..
 
Rb
पिंपळगाव सराई(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपला वाटत असेल की पैशाच्या जोरावर सगळ काही करता येईल ,पण भाजपच्या भ्रमाचा भोपळा आता फुटणार आहे. महाराष्ट्र ही शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. इथली जनता वैचारिक आहे. भाजपच्या पोटात एक अन ओठात एक आहे.वरतून ते आम्ही संविधानाचे पाईक असल्याचे दाखवतात मात्र कृती संविधान विरोधी करतात . त्यांचा खेळ आता जनतेच्या लक्षात आला आहे. संविधान जागर यात्रेला गावागावात उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय, भाजपच्या धोरणांबद्दल लोक मला येऊन भेटतात, बोलतात.आता हवा बदलली आहे, लोक भाजपवाल्यांना घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा घणाघात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला. संविधान जागर यात्रेच्या सहाव्या दिवशी विविध गावात आयोजित जाहीर सभेतून राहुल बोंद्रे यांनी सत्ताधारी भाजपवर प्रहार केला, समारोपीय सभा प्रचंड गर्दीत रायपूर येथे झाली.
  जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून २७ जानेवारीपासून संविधान जागर यात्रा निघाली आहे. संविधानाची पालखी घेऊन ही यात्रा गावागावात जात आहे, पहिल्या टप्प्यात एकूण १०२ गावात ही यात्रा पोहचणार आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल, ३ फेब्रुवारीला सहाव्या दिवसाच्या यात्रेला साखळी बु येथून सुरुवात झाली. त्यानंतर साखळी खु, पांगरी उबरहंडे, केसापुर, मातला, सिंदखेड, रायपुर, पळसखेड भट या गावांत यात्रेचे जोरदार स्वागत झाले. कालचा मुक्काम रायपूर येथे होता.
   लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगून काम...
   देशाला गुलामगीरीतून बाहेर पडायला १५० वर्षे लागली. अनेकांनी रक्त सांडल, अनेक क्रांतिकारकांना फासावर जाव लागलं तेव्हा कुठे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. डॉ.बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली आणि लोकशाही आमच्या देशात सुरू झाली. मात्र आता दिवसा ढवळ्या लोकशाहीची लक्तरे सत्ताधारी पक्षाकडून वेशीवर टांगण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त संस्था असताना त्या आता सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाल्यात. जो कुणी भाजपच्या विरोधात बोलले त्याला इडी चा धाक दाखवल्या जातो असे राहुल बोंद्रे म्हणाले. चिखली विधानसभा मतदारसंघात देखील असच सुरू आहे, सरपंचाला गावाची कामे हवीत तर आधी भाजपमध्ये यायला सांगितले जाते. काहींना गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्या जाते. तरीही जर कुणी त्यांचे ऐकत नसेल तर खोटे गुन्हे दाखल केल्या जातात असे म्हणत राहुल बोंद्रे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका केली.
आज यात्रेचा सातवा दिवस, मुक्काम दहिड खुर्द गावात..
 दरम्यान संविधान जागर यात्रेला आज,४ फेब्रुवारीला पिंपळगाव सराई येथून सुरुवात झाली. यात्रेचा आज सातवा दिवस आहे. ही यात्रा आज सैलानी, ढासाळवाडी, घाटनांद्रा, दुधा, देवपूर, अटकळ, दहिद खुर्द या गावात जाणार आहे. आजचा मुक्काम दहिद खुर्द गावात आहे.