संत चोखोबारायांच्या भूमीत उद्या भरणार संताचा मेळा! शिवसेना युवा नेते योगेश जाधवांचा पुढाकार;
असोला फाट्यावरील शुभांगी लॉन्स मध्ये होणार कार्यक्रम; वारकरी संप्रदायातील दिग्गजांची उपस्थिती; केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधवही राहणार उपस्थित...
Jun 22, 2024, 11:36 IST
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ' धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ' तुका म्हणे मंगळ दाता , कोण आता याहूनी.. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या या पंक्ती आहेत. संतांची भेट म्हणजे धन्यतेचा काळ आहे. संतांहूनी श्रेष्ठ असा कोणी नाही! हे मर्म लक्षात घेता शिवसेना युवानेते योगेश जाधव यांच्या पुढाकारातून संत चोखोबारायांची पावन भूमी देऊळगाव राजा नगरीत संतांचा मेळा जमणार आहे. दरम्यान, पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे. वारकरी संप्रदायातील दिगजांची संतवाणी देखील ऐकावयास मिळणार आहे. देऊळगाव राजा येथील असोला फाट्यानजीक शुभांगी लॉन्स येथे रविवार २३ जून रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संत संमेलनासाठी परभणी येथील स्वामी मनीषचंद महाराज, पळसखेडचे स्वामी हरि चैतन्य महाराज, महंत बालक गिरजी महाराज मंठा, प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूर,
ह.भ.प प्रकाश महाराज जवंजाळ, गोसेवक संजय महाराज पाचपोर, प्रसिद्ध कीर्तनकार सुदाम महाराज पानेगावकर, नाशिक येथील ह.भ. प कांचनताई जगताप, लातूरच्या ह.भ.प अंजलीताई केंद्रे, प्रसिद्ध कीर्तनकार इसरुळ मंगळूर चे पुरुषोत्तम महाराज पाटील, बीड येथील युवा कीर्तनकार संतोष महाराज वनवे यांच्यासह अन्य कीर्तनकार उपस्थित राहणार आहे. दरम्यान, पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा ना. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी वरील दिग्गज संत महात्म्यांचे किर्तन होणार आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी जिल्हाभरातील कीर्तनकार, विणेकरी, टाळकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, चोपदार आणि परमार्थ प्रेमी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेता योगेश जाधव यांनी केले आहे.