Amazon Ad

जिल्हा सामान्य रुग्णालययातील ९९ कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाची एसीएसच्या मार्गदर्शनात होणार चौकशी! हिवाळी अधिवेशनात आमदार गायकवाड यांची लक्षवेधी

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
बुलडाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना काळात झालेल्या ९९ कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान लक्षवेधी उपस्थित करताना सदर व्यवहारात चोरांच्या हाती चौकशी दिल्याचे प्रश्न उपस्थित केल्याने सदर प्रकरणी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनात तत्काळ चौकशी समिती नेमण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली.
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना काळादरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने तब्बल ९९ कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला होता. सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. सदर प्रकारात गुंतलेल्या लोकांच्या हातात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावरून नागपूर येथे आयोजित हिवाळी अधिवेशनात आमदार संजय गायकवाड यांनी लक्षवेधी उपस्थित करताना आरोग्यमंत्र्याचे लक्ष केंद्रित करून सदर प्रकरण हे चोरांच्या हातात चौकशी साठी देण्यात आल्याचे लक्षात आणून दिले. 
या प्रकरणाचे गांभीर्य पाहता राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याप्रकरणी तत्काळ आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनात चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले असल्याने आता सदर गैरव्यवहार प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल अशी चर्चा होत आहे.