जिल्ह्यातील समस्यांना सभागृहात वाचा फोडावी ! जयश्रीताई शेळके यांचे विरोधी पक्षनेत्यांना निवेदन ; नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घेतली भेट
Updated: Dec 14, 2023, 15:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्ह्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावे यासंदर्भात काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. शासनाच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने अधिवेशनावर हल्ला बोल मोर्चाचे आयोजन केले होते. जयश्रीताई शेळके यांनी या मोर्चात सहभाग नोंदवला. तसेच जिल्ह्यातील विविध समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी प्रश्न उपस्थित करावे याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले. सिंदखेड राजा विकास आराखड्यासाठी मंजूर ११२ कोटी रुपयांतून पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात आजवर केवळ साडे बारा कोटींची कामे झालेली आहेत. ही कामे आणि निधी सुद्धा दोन वर्षांपूर्वीच संपला आहे. आता प्रशासनाने ४०४ कोटींचा नवा विकास आराखडा तयार करुन सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. शेगाव विकास आराखड्यातील जवळपास ९७ टक्के कामे पूर्ण झाल्याचे शासनाच्या अहवालातून सांगण्यात येते. उर्वरित कामे सुद्धा लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. जागतिक कीर्तीचे सरोवर असलेल्या लोणार विकासासाठी ३६९ कोटी ७८ लाख रू. निधीतून कामांना चालना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. परंतु आराखड्यातील अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. या कामांना गती मिळायला हवी.
अवकाळीग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी
जिल्ह्यात २७ व २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने थैमान घातले. यामध्ये जिल्ह्यातील ३६ हजार हेक्टर शेतीचे अतोनात नुकसान झाले. तूर, हरभरा, कपाशी, भाजीपाला, संत्रा, मोसंबी, पेरु, द्राक्ष, डाळींब, तूर या पिकांना चांगलाच फटका बसला. जिल्ह्यातील १००६ शेडनेट उध्वस्त झाले आहेत. तर जिल्ह्यातील २८७ गावे बाधित झाली. तब्बल ५२ घरांची पडझड झाली असून पशुधनाची सुद्धा हानी झाली. याबाबत पाठपुरावा करून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळवून द्यावी, अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी केली.
जिगाव प्रकपाच्या कामांना मिळावी गती
बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील खार पानपट्ट्याला वरदान ठरणाऱ्या जिगाव प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढत चालली आहे. १९९४ मध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पाची सुरुवातीची किंमत ७३५ कोटी रुपये होती. परंतु अनेक अडचणींमुळे कामास विलंब झाला. परिणामी कामाची किंमत वाढत जावून ४०४४.१४ कोटी रुपयांवरुन ११४५७.९५ कोटी आणि आता तब्बल १७ हजार ५०० कोटींपेक्षा अधिक झाली आहे. प्रकल्पाची किंमत वाढत असल्याने या प्रकल्पाबाबत वेळोवेळी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे सभागृहाचे लक्ष वेधून वेगाने प्रकल्पाची कामे पूर्ण करावी, अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी केली.