"त्या' चार गावांचा प्रश्न निकाली निघणार; उद्याच होणार प्लॉटचे वितरण; आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांची माहिती

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे अनेक समस्यांचा सामना करत असलेल्या घानमोड, मानमोड, पांढरदेव व देवदरी येथील ग्रामस्थांनी २३ जानेवारीपासून उपोषण सुरू केले आहे. पुनर्वसनाबद्दल ठोस निर्णय न घेतल्यास २६ जानेवारीला प्रकल्‍पात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला. काल, २३ जानेवारीला आमदार श्वेताताई महाले यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन संघर्षाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले होते. दरम्यान आज, २४ जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी, पुनर्वसन विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यानंतर उद्या, २५ जानेवारीला ग्रामस्थांना प्लॉटचे वितरण करण्यात येईल, असा निर्णय झाल्याचे आ. सौ. महाले पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
याआधी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता. मात्र निधीअभावी हे प्रकरण कालबाह्य झाले होते. त्यामुळे जलसंपदा मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा भंग झाला आहे. जलसंपदामंत्री शब्द पाळू शकले नाहीत. त्यामुळे अजूनपर्यंत या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता म्हणून दुर्दैवाने गावकऱ्यांना इच्छामरणाचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे सौ. श्वेताताई महाले काल म्हणाल्या होत्या. यासंदर्भात आज पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बैठक बोलावली. उद्याच्या उद्या गावकऱ्यांना प्लॉटचे वितरण करण्यात येईल. येणाऱ्या अधिवेशनात या गावांच्या नागरी सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी मिळावा यासाठी आपण आणि पालकमंत्री डॉ. शिंगणे मिळून प्रयत्न करणार आहोत, असेही सौ. महाले पाटील म्हणाल्या.